जनकल्याण सहकारी बँकेची दमदार पन्नाशी अंदाजे 2500 कोटींची आर्थिक उलाढाल

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून गणल्या जाणाऱ्या जनकल्याण सहकारी बँकेचे 51 व्या वर्षात पदार्पण होत आहे. बँकेने यंदा अंदाजे तब्बल 2500 कोटींची आर्थिक उलाढाल केली आहे. बँकेचा कारभार 26 शाखांमधून चालतो. बँकेला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उद्या, 29 मे रोजी बँकेच्या सर्व शाखा आणि मुख्य कार्यालयात औपचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध शाखांमध्ये तसेच मुख्य कार्यालयात भारतमाता पूजन. दीप प्रज्वलनाने विविध कार्यक्रमांची सुरुवात करण्यात येईल. त्यानिमित्ताने बँकेचे संचालक मंडळ, हितचिंतक, सन्माननीय ग्राहक आणि बँकेचे कर्मचारी उपस्थित राहाणार आहेत. बँकेने नावाप्रमाणेच सामाजिक बांधिलकी जपत प्लॅस्टिक हटाव, ई-कचरा व्यवस्थापन, सायबर या विषयात जनजागृतीपर अनेक उपक्रम राबवले. बँकेच्या पुढील वाटचालीत आणखी एक शाखा वाढवण्याचे लक्ष्य आहे. आगामी काळात बँकेची घोडदौड मल्टीस्टेटच्या दिशेने सुरू आहे आणि लवकरच हे उद्दिष्ट साध्य करू, असे बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर यांनी सांगितले.

बँकेच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम काम
गेली अठरा वर्षे बँकेचे संचालक राहिलेले आणि गेली सहा वर्षे बँकेचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळणारे संतोष केळकर यांच्या अथक प्रयत्नाने बँकेची प्रतिमा जनमानसात जपली गेली. बँकेचे भागधारक, ग्राहक, कर्जदार यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन नवनवीन योजना केळकर यांनी राबवल्या. बँकेचे हित पेंद्रस्थानी ठेवून खंबीरपणे नॉन परफॉर्मिंग झालेली वसुली सनदशीर मार्गाने करण्याचे निर्देश दिले. वसुली करताना धाक दाखवून किंवा दहशतीच्या मार्गाचा अवलंब केला जात नाही, हे बँकेचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ आहे.

– स्थापनेच्या वेळी म्हणजेच 1974-75 मध्ये बँकेच्या ठेवी पाच लाख रुपये तर एकूण कर्जे दीड लाखापर्यंत होती.
– 25 वर्षांनंतर ठेवी 460 कोटींवर तर कर्जे 270 कोटींवर गेली.
– स्वच्छ पारदर्शी व्यवहाराने 25 वर्षांतच म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्षातच बँकेला शेडय़ुल्ड असा दर्जा मिळाला.

सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा वसा
एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ आणि विना सहकार नही उद्धार या वचनांना आधारभूत मानून सर्वसामान्य माणसांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा बँकेने वसा घेतला. केवळ व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता, सामाजिक बांधिलकी जपत बँकेने सामाजिक संस्थांना वेळोवेळी अर्थसहाय्य केले. कश्मीरमधील पीडितांचे पुनर्वसन करणाऱया संस्थेला मदत, किल्लारी यथील भूपंपग्रस्त आणि आदिवासींना मदत असे उपक्रम बँकेने राबवले आहेत. बँकेने प्लॅस्टिकमुक्त मुंबई अभियानांतर्गत कापडी पिशव्यांचे वितरण केल्याचे जनकल्याण सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक उज्ज्वला करंबेळकर यांनी सांगितले.