जनता कर्फ्यू उठल्यावरही बाजारात शुकशुकाट! व्यापारी संघाची मनमाड शहरात रिक्षाद्वारे जनजागृती

मनमाड शहर आणि परिसरांत कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी बुधवारपासून सुरू असलेला जनता कफ्र्यू रविवारी रात्री संपला. त्यामुळे आज सोमवारी सकाळपासून मनमाड शहराची बाजारपेठ पुन्हा एकदा खुली झाली. मात्र ५ दिवसांच्या जनता कर्फ्यूनंतर बाजारपेठेत गर्दी उसळण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु ५ दिवसांनंतर बाजारपेठ खुली होऊनही बाजारपेठेत तुरळक गर्दी होती.

सोमवारी सकाळपासून पुन्हा जुन्या नियमावलीनुसार सम -विषम पध्दतीने मनमाडची बाजारपेठ सुरू झाली. शहराच्या मुख्य रस्त्यांसह राज्य मार्गासह विविध भागात असलेली दुकाने आज सम -विषम पद्धतीने खुली झाली. पण बाजारपेठेत तुरळक गर्दी दिसून आली. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहर व्यापारी संघाने सोमवारी सकाळपासून शहराच्या सर्व भागात रिक्षाद्वारे जनजागृती सुरू केली. लोकांनी विनाकारण गर्दी करू नये, तोंडाला मास्क लावावा, सॅनिटायजरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अशा विविध मार्गदर्शक सूचना ध्वनीक्षेपकाद्वारे करण्यात आल्या.

मनमाड शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मनमाड शहर व्यापारी महासंघाने जनता कफ्र्यू पाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारपासून शहरात जनता कर्फ्यूची अंमलबजावणी सुरू झाली. पहिल्याच दिवशी या जनता कफ्र्यूचा प्रभाव जाणवला. नंतर मात्र संमिश्र प्रतिसाद मिळत गेला. या कालावधीत बहुतांश बाजारपेठ बंद होती. पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूनंतर सोमवारपासून सम -विषम पध्दतीनुसार बाजारपेठ सुरू झाली. शहराच्या मुख्य रस्त्यासह विविध भागात दुकानांमध्ये वस्तु खरेदी करण्यासाठी ग्राहक हजर होते. परंतु खूप गर्दी बाजारपेठेत झाली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या