
2021 हे वर्ष कोरोनाप्रमाणेच अवकाळी पावसामुळेही महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात राहिलं. अगदी डिसेंबर महिन्यातही राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. नवं वर्ष सुरू झालं असून नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पुन्हा अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. 7 जानेवारी ते 10 जानेवारीदरम्यान राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता असल्याचे या अंदाजात म्हटले आहे. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याने म्हटलं आहे.
7 जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 8 आणि 9 जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून 10 जानेवारीला मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.