जपानमध्ये ‘हगिबीस’ चक्रीवादळाचे थैमान, 42 लाख नागरिक बेघर

1109

जपानमध्ये तब्बल 60 वर्षांनंतर महाभयंकर अशा ‘हगिबीस’ चक्रीवादळाने थैमान घातले असून टोकियो शहरात आकाश गुलाबी झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे घरांचे छप्पर उडाले असून इमारतींची तावदाने फुटून रस्त्यांवर काचांचा खच पडला आहे. ताशी 180 किमी प्रति तास वेगाने हे वारे वाहत असल्याने शहरात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

फिलिपाईन्सने या चक्रीवादळाला ‘हगिबीस’ नाव दिले आहे. तेथील स्थानिक भाषेत ‘हगिबीस’ म्हणजे वादळी वारे. या वादळामुळे टोकियो शहरातील आकाश गुलाबी जांभळे झाले असून नागरिकांमध्ये भीतिचे वातावरण आहे. जपानमध्ये 1958 साली अशाच प्रकारे चक्रीवादळाने थैमान घातले होते. त्यावेळी 1200 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर हजारो लोकं बेघर झाले होते. त्याच वादळाची आठवण करुन देणारे हे वादळ असल्याचे स्थानिक सांगत आहेत. 180 प्रति तास वेगाने वाहणाऱ्या या वादळी वाऱ्याने सगळीकडे हाहाकार उडवला आहे. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या दूरवर फेकल्या गेल्या आहेत. यात एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

पूर आणि भूस्खलनची शक्यता असल्याने जपान सरकारने समुद्र किनारे रिकामे केले असून देशांतर्गत विमानसेवेबरोबरच रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. 1929 आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणही रद्द करण्यात आली आहेत. नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी नागरिकांना सर्तक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, जपानमध्ये होणारे रग्बी विश्व कप सामने रद्द करण्यात आले आहेत. खेळाडूंना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या