नववर्षात बुमराहचे “बूम बूम”, तुफानी गोलंदाजीसाठी मानाचा पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर

903

वेगवान गोलंदाजी करतानाची अनोखी ऍक्शन आणि यष्ट्यांवर नेम धरून सोडलेला अचूक यॉर्कर अशी कामगिरी साकारणाऱ्या जसप्रीत बुमराहसाठी नवे वर्ष “बूम बूम” ठरले आहे. त्याच्या गेल्या वर्षीच्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्याला यंदा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय गोलंदाज म्हणून पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा बीसीसीआयने मुंबईत केली.

2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या जसप्रीत बुमराहने आपल्या अचूक तेजतर्रार गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या तालावर नाचायला लावले आहे. बुमराहने केवळ 12 कसोटी सामन्यांत 62 बळी मिळवत फार कमी कालावधीत संघातले आपले स्थान पक्के केले.शिवाय अनेक महत्वाच्या मालिकांमध्ये संघाला विजय मिळवून देण्यात बुमराहची भूमिका महत्वाची होती. त्याच्या याच चमकदार कामगिरीचा आता बीसीसीआयतर्फे सन्मान केला जाणार आहे.

आयसीसीच्या वनडे क्रमवारीतील अव्वल गोलंदाज बुमराहने जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पदार्पण केले होते. त्याने आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, आणि वेस्ट इंडिज संघांविरुद्ध प्रत्येकी 5 विकेट घेण्याची कामगिरी कामगिरी करणारा तो पहिला आणि एकमेव आशियाई गोलंदाज ठरला.

तिन्ही फॉरमॅटमध्ये यश
बुमराहने एक ऑक्टोबर 2018 ते 30 सप्टेंबर 2019 या काळात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या 6 कसोटी सामन्यांमध्ये 34 विकेट घेतल्या. तर 17 वनडेत 31 विकेट आणि 7 टी-20 सामन्यात 8 विकेट घेतल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यातील इतर सन्मानार्थी खेळाडूंची यादी –
कर्नल सी.के.नायडू जीवनगौरव पुरस्कार – कृष्णम्माचारी श्रीकांत : (प्रमाणपत्र-सन्मानचिन्ह आणि 25 लाखांचा धनादेश)
महिला खेळाडूंसाठी जीवनगौरव पुरस्कार – अंजुम चोप्रा : (प्रमाणपत्र-सन्मानचिन्ह आणि 25 लाखांचा धनादेश)
पॉली उम्रीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू – जसप्रीत बुमराह : (प्रमाणपत्र-सन्मानचिन्ह आणि 15 लाखांचा धनादेश)
सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय खेळाडू – पूनम यादव : (प्रमाणपत्र-सन्मानचिन्ह आणि 15 लाखांचा धनादेश)

याव्यतिरीक्त 2018-19 सालात कसोटीत सर्वाधिक धावा करण्यासाठी चेतेश्वर पुजारा, सर्वाधिक विकेटसाठी जसप्रीत बुमराह यांचा सत्कार होणार आहे. तर महिला क्रिकेटपटूंमध्ये वन-डे सामन्यात सर्वाधिक धावांसाठी स्मृती मंधाना तर सर्वाधिक बळी घेण्यासाठी झुलन गोस्वामी यांची निवड करण्यात आलेली आहे. मयांक अग्रवालला सर्वोत्तम पदार्पणीय पुरुष तर शेफाली वर्माला सर्वोत्तम पदार्पणीय महिला खेळाडू या किताबाने गौरवण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या