बुमराहचा नवा माइलस्टोन, लिजेंड गोलंदाज लीली, बिशप यांच्या क्लबमध्ये एन्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने अल्पावधीत आपल्या धारधार गोलंदाजीची ताकद दाखवून दिली. बुमराहचा आजमितीला जगातील आघाडीच्या वेगवान गोलंदाजांमध्ये समावेश होतो. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये तो टीम इंडियाचा ‘हुकमी एक्का’ आहे. चेन्नईत नुकत्याच झालेल्या कसोटी लढतीत टीम इंडियाचा इंग्लंडकडून पराभव झाला, मात्र जसप्रीत बुमराह याने नवा माइलस्टोन गाठला.

इंग्लंडविरुद्ध चेन्नईच्या एमए. चिदंबरम मैदानात झालेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव झाला. परंतु या लढतीत जसप्रीत बुमराह याने पहिल्या डावात एक आणि दुसऱ्या डावात तीन अशा एकूण चार विकेट्स घेतल्या. या बळावर त्याने एक खास विक्रम आपल्या नावे केला आणि क्रिकेट विश्वातील लिजेंड गोलंदाज डेनिस लीली, ज्योफ लॉसन आणि इयान बिशप यांच्या क्लबमध्ये स्थान मिळवले.

चेन्नईमध्ये झालेला कसोटी सामना बुमराहचा घरच्या मैदानावरील पहिला सामना, तर कारकीर्दीतील 18 वा सामना होता. या लढतीत त्याने चार बळी घेतले. यासह त्याच्या नावावर एकूण 83 बळींची नोंद झाली आहे. डेनिस लीली, ज्योफ लॉसन आणि इयान बिशप यांनीही 18 व्या कसोटीमध्ये 83 बळी घेतले होते.

INDvsENG पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाला धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर

पठाणला पछाडले

टीम इंडियाकडून पहिल्या 18 कसोटीत सर्वाधिक बळींची नोंद आता बुमराहच्या नावावर झाली आहे. बुमराहने टीम इंडियाचा माजी गोलंदाज इरफान पठाण याला मागे टाकले. पठाणने 18 कसोटीत 73 बळी घेतले होते, तर मोहम्मद शमीच्या नावावर पहिल्या 18 कसोटीत 66 बळींची नोंद आहे.

18 कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे वेगवान गोलंदाज

जसप्रीत बुमराह – 83

इरफान पठान – 73

मोहम्मद शमी – 66

कपिल देव – 64

एस श्रीसंत – 62

करसन घावरी – 59

वेंकटेश प्रसाद/उमेश यादव – 58

मनोज प्रभाकर – 53

रमाकांत देसाई / चेतन शर्मा / ईशांत शर्मा – 52