मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी, जतच्या जनतेची दिशाभूल करणारी! भाजपच्या माजी आमदाराचा थेट आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘‘जत तालुक्यातील 65 गावांना पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हैसाळ विस्तारित योजनेची केलेली घोषणा ही फसवी, खोटारडी आहे. मुख्यमंत्र्यांनी जतच्या जनतेची दिशाभूल करू नये,’’ असा खळबळजनक आरोप भाजपचे माजी आमदार विलास जगताप यांनी आज केला. मुळात शुक्रवारी या योजनेसंदर्भात मुंबईत कोणतीही बैठक झालेली नाही, असा गौप्यस्फोटही जगताप यांनी केला आहे.

कर्नाटकच्या सीमेलगतच्या जत तालुक्यातील गावांना पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या घोषणेवर जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुनील पवार, माजी नगरसेवक उमेश सावंत उपस्थित होते.

विलासराव जगताप म्हणाले, ‘‘काल ‘सह्याद्री’वर मुख्यमंत्र्यांनी लावलेली बैठक ही म्हैसाळ योजनेसाठी नव्हतीच. जत तालुक्यात ‘जलजीवन मिशन’ योजनेअंतर्गत सुरू असणाऱया कामांना गती देण्यासाठी होती. या कामासाठी 200 कोटी रुपये त्यांनी दिले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, विस्तारित योजनेबाबत केलेले वक्तव्य साफ खोटे आणि दिशाभूल करणारे आहे.’’

‘‘या योजनेला अद्यापि कसलीही तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी, त्याचे बजेट आणि अजूनही कॅबिनेटसमोर विषय आलेला नाही. शिवाय कालच्या बैठकीला ज्यांच्याकडे जलसंपदा विभागाचे खाते आहे, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. जलसंपदा खात्याचे सचिव, अधिकारीदेखील उपस्थित नव्हते. जोपर्यंत विस्तारित योजनेसाठी ठोस असा निर्णय होत नाही, तोवर आम्ही विश्वास ठेवणार नाही. यासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने जत-म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी स्वतंत्र बैठक घ्यावी. या बैठकीला तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, पाणी योजनांचे जाणकार, अभ्यासक व ज्यांनी संघर्ष केला, अशा सर्वांना बोलावून ठोस कृतिशील कार्यक्रम जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे,’’ असेही जगताप म्हणाले.