
क्रिकेट वर्तुळामध्ये सध्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. इंडियन प्रीमियर लीगचा पहिला हंगाम गाजवल्यानंतर दुसऱ्या हंगामातही वैभवने आपला फॉर्म कायम राखला आहे. राजस्थानला ‘पॉवर’ सुरूवात करून देणाऱ्या वैभवचे हिंदुस्थानचे माजी खेळाडू आणि बीसीसीआयचे क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य जतीन परांजपे यांनी भरभरून कौतुक केले आहे. जतीन परांजपे यांनी वैभवची तुलना थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली आहे. यावेळी त्यांनी वैभवला भविष्यासाठी एक मोलाचा सल्लाही दिला आहे. ते ‘सामना ऑनलाईन’शी बोलत होते.
मला वाटतं सचिन तेंडुलकरनंतर मी असं टॅलेंट पहिल्यांदाच बघतोय. वैभवमध्ये खरोखरच काहीतरी खूप खास आहे. पण खेळाडू हे हळूहळू विकसित होत असतात, त्यामुळे आपण थोडा धीर धरला पाहिजे. त्याच्याकडे तेंडुलकरच्या पातळीचं टॅलेंट नक्कीच आहे, पण सचिनला त्यांच्या खेळातील सततच्या सुधारणेच्या आलेखाने महान बनवलं, असे जतीन परांजपे म्हणाले.
जतीन परांजपे यांनी वैभवच्या फलंदाजीतील एका महत्त्वाच्या पैलूकडे लक्ष वेधले. वैभवसाठी सुधारणेचा मार्ग हा रेड बॉल अर्थात कसोटी क्रिकेटमध्ये दडलेला आहे. त्याला तिथे एक चांगला खेळाडू बनण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. मला त्याच्याबद्दल एकच शंका वाटते ती म्हणजे त्याची चेंडू डिफेंड करण्याची क्षमता. त्याच्या शब्दकोशात सध्या डिफेंड हा शब्दच नाहीये असं वाटतं, त्यावर त्याला काम करावं लागेल, असेही ते म्हणाले.
वैभव सूर्यवंशी याला हिंदुस्थानच्या राष्ट्रीय संघात स्थान देण्यासाठी निवडकर्ते उतावळे असतील. पण त्यांना घाई न करण्याचा सल्लाही परांजपे यांनी दिला. कदाचित त्याची निवड होईलही, पण त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटचे अजून एक-दोन हंगाम खेळायला हवेत. यामुळे त्याला स्वतःचा खेळ अधिक स्थिर करण्यास आणि मानसिकदृष्ट्या प्रगल्भ होण्यास मोठी मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. अंडर-19 क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीमध्ये हिंदुस्थानी क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार दिसत असल्याचे परांजपे यांनी स्पष्ट केले आहे.
एका क्लिकवर मनसोक्त खेळा!
क्रीडा संस्कृतीला डिजिटल जोड देण्यासाठी ‘खेलो मोअर’ हे अॅप खेळाडू आणि क्रीडाप्रेमींसाठी अत्यंत फायदेशीर ठरतअसल्याचे जतीन परांजपे यांनी सांगितले. या अॅपच्या माध्यमातून खेळाडूंना आपल्या परिसरातील नामवंत क्रीडा अकादमी, अनुभवी प्रशिक्षक आणि खेळाची मैदाने शोधणे सोपे झाले आहे. विशेषतः क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटन यांसारख्या खेळांसाठी जवळचे टर्फ किंवा ग्राउंड बुक करण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध आहे. पालकांना आपल्या मुलांसाठी योग्य प्रशिक्षणाची निवड करता यावी आणि स्थानिक स्पर्धांची माहिती मिळावी, या उद्देशाने हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


























































