हिंदुस्थान सुरक्षित देश नाही, आयसीसीने बहिष्कार घालावा, जावेद मियाँदाद बरळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान हा देश सुरक्षित नाही. त्यामुळे आयसीसीने या देशात क्रिकेट खेळण्यावर बहिष्कार घालावा, असे बेताल वक्तव्य पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियाँदाद याने केले आहे. त्याने एका मुलाखतीत ही मागणी केली असून त्याच्या या वक्तव्यावरून त्याने स्वत:चेच हसे करून घेतले आहे. त्याच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘हिंदुस्थानात हिंसाचार वाढला आहे. कश्मीरी व मुस्लींमांना द्वेषाची वागणूक मिळत आहे. देशभरात आंदोलनं सुरू आहेत. त्यामुळे हिंदुस्थान हा आता सुरक्षित राहिलेले नाही. आपण क्रिडापटूंनी देखील हे मुद्दे उपस्थित केले पाहिजेत. त्यामुळे माझी आय़सीसीला विनंती आहे की त्यांनी सर्व देशांना हिंदुस्थानचा दौरा करण्यापासून रोखावे. तसेच हिंदुस्थानवर बहिष्कार घालावा’, अशी मागणी मियाँदादने केली होती.

यावेळी त्यांनी सर्व देशांना देखील हिंदुस्थानवर बहिष्कार घालण्याचा सल्ला दिला. ‘हिंदुस्थानात जनावरासारखे लोकांना मारले जात आहे. त्यामुळे सर्व देशांनी आता मानवतेसाठी हिंदुस्थानविरोधात कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे’, असे मियाँदादने यावेळी सांगितले.

पाकिस्तानमध्ये कसोटी खेळण्य़ास बांगलादेशने नकार दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नालस्ती झाली आहे. पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास अद्याप बरेच देश नकारच देत असताना जावेद मियाँदादने हिंदुस्थानला असुरक्षित असल्याचे म्हणने हास्यास्पद आहे.