बालाकोटच्या वेळीच युद्धाला जवान सज्ज होते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानात घुसून 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बहल्ला केला. त्यानंतर पाकच्या विमानांनी हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यावेळी पाकिस्तानने आगळीक केली असती तर आमचे जवान पारंपरिक युद्धालाही सज्ज होते, असे हिंदुस्थानचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी निवृत्त लष्करी अधिकाऱयांशी बोलताना स्पष्ट केले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कोणती कारवाई करायची यावर अनेक पर्यायांचा विचार झाला होता, असेही त्यावेळी रावत यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत हिंदुस्थानी लष्कराकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि दारूगोळा उपलब्ध झाला आहे. यापूर्वी त्यांची टंचाई होती. कश्मीर खोऱयातून 370 कलम हटविल्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार आगळीक केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताही हिंदुस्थानी जवान पूर्णपणे सज्ज आहेत, असेही बिपीन रावत यांनी सांगितले.