जायकवाडीचा जलविसर्ग वाढवला! दुसऱ्यांदा दरवाजे उघडले

जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज रविवारी दुपारी १ वाजता जलविसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाच्या २७ पैकी १८ दरवाजे १ फुटावरून दोन फूट वर उचलून ३७ हजार क्युसेकचा जलौघ गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली.

वर्षी पावसाळ्यात जायकवाडी धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्यात आले आहेत. जूनच्या प्रारंभीच नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. नाथसागर जलाशयाच्या वरच्या भागातील सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली. तेव्हा ३१ जुलै रोजी जायकवाडी प्रकल्पाच्या २७ पैकी १८ दरवाजे वर करून जलविसर्ग सुरू करण्यात आला होता. ५ ऑगस्ट रोजी पाण्याची आवक घटल्याने दरवाजे बंद करून जलविसर्ग थांबवण्यात आला होता.

२० दिवसांपासून गोदापात्रात विसर्ग सुरू
दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी नाथसागर जलाशयाने दुसऱ्यांदा धोक्याची पाणीपातळी गाठली. त्यामुळे पुन्हा १८ दरवाजे उघडावे लागले. २० दिवसांपासून हे दरवाजे उघडे असून, आज पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढल्यामुळे जलविसर्गही वाढवण्यात आल्याची माहिती दगडी धरण उपविभागीय कार्यालयाचे ज्येष्ठ तंत्रसहायक गणेश खराडकर यांनी दिली.

अहिल्यानगरातूनही आवक
अहिल्यानगर जिल्ह्यातील खालील ५ धरणे तुडुंब भरली असून त्यातूनही पाणी सोडण्यात आले आहे. ते क्युसेकनुसार याप्रमाणे: भंडारदरा ४ हजार ३०० क्युसेक, निळवंडे ४ हजार ७६६, मुळा ५ हजार क्युसेक, आधाळा २५ क्युसेक व ओझर-वेअर ४ हजार ४३१ क्युसेक आदी. वरील सर्व २१ प्रकल्पांतून सोडण्यात आलेले हे पाणी कमीअधिक प्रमाणात गोदावरी नदीच्या पात्रातून थेट नाथसागर जलाशयात दाखल होत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाची दरवाजे आणखी काही काळ उघडेच ठेवावे लागणार आहेत.

२१ धरणांतून येत आहे नवीन जलौघ
या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील १६ छोट्या मोठ्या प्रकल्पांतून खालीलप्रमाणे जलविसर्ग सुरू करण्यात आला आहे. दारणा ६ हजार २०० क्युसेक, गंगापूर (जिल्हा नाशिक) ३ हजार २०, कश्यपी ६४०, वालदेवी १७४, होळकर ४ हजार ३४८, भावली ७०१, भाम १ हजार ७९४, वाघाड १ हजार ४२९, पालखेड १० हजार १७६, पुणेगाव २ हजार ८५०, ओझरखेड २ हजार ३८३, गौतमी ५७६, मुकणे ३६३, करंजवण ५ हजार ७५१, वाकी ८५५, कडवा ८४०, तिसगाव ६० व नांदुर मधमेश्वर २२ हजार ८५ क्युसेक.