जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीचा नगरमध्ये निषेध; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ईडी, सीबीआय, एनआयबी, अशा केंद्रीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची इडी कडून चौकशी करण्यात आली, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध व्यक्त करत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, ईडी, सीबीआय, एनआयबी, अशा केंद्रीय यंत्रणाचा दुरुपयोग विरोधी पक्षाची मुस्कटदाबी करण्यासाठी सत्ताधारी करत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्यासाठी त्यांना 13 महिने तुरुंगात ठेवण्यात आले. मात्र, चौकशीत सत्य निष्पन्न झाले. तसेच माजी मंत्री नवाब मलिक यांनाही त्यांनी काही चुकीच्या गोष्टी लोकांसमोर आणल्या म्हणून तुरुंगात टाकण्यात आले. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली असून ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या मागेही चौकशी लावण्यात आली.

सत्ताधारी हे या यंत्रणाचा गैरवापर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाहीतर अन्य विरोधी पक्षातील नेत्यांबाबत ही सुरू आहे. साम, दाम, दंड, भेद कोणत्याही मार्ग सत्ता मिळवण्यासाठी भाजप हे कृत्य राज्यात सुरू आहे. तसेच हे कृत्य संपूर्ण देशाने पाहिले आहेत. फोडाफोडीचे राजकारण करून आणि आमदार पळून राज्यामधील सरकार पाडण्याचे असल्याचे प्रयोग सुरू असून महाराष्ट्र राज्यात तर आता खोके सरकार अशी संघाच्या सरकारची ओळख झाली आहे. विरोधकांना संपवण्याचे असे राजकारण देशाच्या व राज्याच्या हिताचे नाही. कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अशा राजकारणाला जनतेने नाकारल्याचे दिसून आले आहे. हे चित्र आगामी काळात देशात व महाराष्ट्रात ही दिसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विरोधकांवर सुरू असलेल्या दबाव तंत्राचा जाहीर निषेध व्यक्त करत निवेदन देण्यात आले.