महायुतीतील गद्दारी उघड; ‘झाडी-डोंगर’वाल्या पाटलांना भाजपने दिला धोबीपछाड! विधानसभेला शेकापला मदत केल्याची पालकमंत्री गोरे यांची कबुली

सांगोला विधानसभेचे महायुतीतील मिंधे गटाचे ‘झाडी-डोंगर’वाले उमेदवार शहाजीबापू पाटील यांना भाजपने ‘धोबीपछाड’ देऊन शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणल्याची जाहीर कबुली आज ग्रामविकासमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. गोरे यांच्या या राजकीय गौप्यस्फोटामुळे भाजप आपल्या सहकारी मित्रपक्षांचा कसा केसाने गळा कापतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. निमित्त होते, सांगोल्यातील भाजप पक्षप्रवेशाचे. शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या काही कार्यकर्त्यांनी काल भाजपमध्ये प्रवेश होता. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गोरे यांनी हा गौप्यस्फोट केला.

शेकाप आमदार देशमुख यांच्यावर टीका करताना पालकमंत्री गोरे म्हणाले, ‘देशमुखसाहेब, गेल्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला भाजपने मदत केली नसती तर तुम्ही आमदार झाला नसता. महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदे गटातील शहाजीबापू पाटील उभे असताना भाजपने युतीधर्म न पाळता, शेकापला मदत केली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार पाटील यांचा पराभव झाला,’ असे गोरे यांनी सांगितले.

पाटलांना मदतीची गरज असतानाही भाजपने शेकापच्या देशमुखांना मदत केल्याचे पालकमंत्री गोरे यांनी जाहीरपणे सांगून टाकले. दरम्यान, या कार्यक्रमाआधी निघालेल्या रॅलीनंतर स्व. गणपतराव देशमुख यांच्या बंगल्यावर समाजकंटकाने हल्ला केल्यानंतर तणाव निर्माण झाला होता.