
नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचा मोकामा मतदारसंघाचा उमेदवार अनंत कुमार सिंह याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ‘बाहुबली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनंत सिंह याने प्रचारादरम्यान प्रतिस्पर्धी जन सुराज पार्टीच्या उमेदवाराच्या समर्थकाची हत्या केल्याचा आरोप आहे.
अनंत कुमार सिंह हा ‘बाहुबली’ म्हणून प्रसिद्ध असून गेल्या अनेक वर्षांपासून मोकामावर त्याची राजकीय पकड आहे. निवडणुकीत त्याचा सामना मोकामातील दुसरा ‘बाहुबली’ सूरजभान सिंह याची पत्नी माजी खासदार वीणा देवी यांच्याविरुद्ध होणार आहे. वीणा देवी राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार आहेत.
अनंत सिंह हा 1990 पासून मोकामा येथून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आला आहे. त्याची एपूण संपत्ती 38 कोटी असून त्याच्याकडे सवातीन कोटींच्या तीन आलिशान गाड्या आहेत. त्याच्या पत्नीच्या नावे 62.72 कोटींची संपत्ती आहे. या दोघांकडे कोटय़वधी रुपयांचे दागिने असून घोडे आणि गायीदेखील आहेत.
कोण आहे अनंत सिंह?
अनंत सिंह याच्यावर वेगवेगळे 28 गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी एका गावात अनंत सिंह आणि जन सुराजचे उमेदवार पीयूष प्रियदर्शनी यांचा ताफा समोरासमोर आला. त्यावेळी दोन्ही गटांत धुमश्चक्री उडाली. यावेळी 75 वर्षीय दुलारचंद यादव यांची हत्या करण्यात आली होती. दुलारचंद हे पूर्वीपासून लालूप्रसाद यांचे समर्थक आहेत, मात्र या निवडणुकीत जन सुराज पार्टीच्या उमेदवाराचे प्रचारक होते. या हत्येप्रकरणी अनंत सिंहला अटक करण्यात आली आहे.



























































