
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या जेईई मेन परीक्षांच्या नव्या तारखा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांनी आज जाहीर केल्या. तिसऱया सत्रातील परीक्षा 20 जुलै ते 25 जुलै या कालावधीत तर चौथ्या सत्रातील परीक्षा 27 जुलैपासून 2 ऑगस्टपर्यंत घेतली जाणार आहे. परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्याने देशातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
जेईई मेन परीक्षा यंदापासून वर्षातून चार वेळा घेण्यात येणार आहेत. त्यातील पहिल्या आणि दुसऱया सत्रातील परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पार पडल्या. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे तिसऱया व चौथ्या टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. कोरोना नियंत्रणात येत असल्याने आज त्यांच्या तारखा शिक्षणमंत्री पोखरीयाल यांनी जाहीर केल्या. तिसऱया सत्रासाठी 6 लाख 80 हजार तर चौथ्या सत्रासाठी 6 लाख 9 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
शिक्षणमंत्री पोखरीयाल यांनी आज परीक्षांच्या तारखांची घोषणा करतानाच जे विद्यार्थी जेईई मेन परीक्षेसाठी अर्ज करू शकले नाहीत. त्यांना अर्ज करण्यासाठी एक संधी दिली जात असल्याचेही सांगितले. तिसऱया सत्रासाठी आजपासून 8 जुलैच्या रात्री 11.50 वाजेपर्यंत तर चौथ्या सत्रातील जेईई मेन परीक्षेसाठी 9 जुलैपासून 11 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्याच प्रमाणे राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र बदलण्याचीही संधी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करता यावे म्हणून केंद्रांची संख्याही वाढवण्यात आल्याचे पोखरीयाल यांनी सांगितले.
सुरक्षेसाठी उपाययोजना
- परीक्षा केंद्रावर प्रत्येक विद्यार्थ्याला नवा मास्क.
- प्रवेशद्वारावरील गर्दी टाळण्यासाठी केंद्रावर पोहोचण्याच्या वेगवेगळ्या वेळा.
- एका विद्यार्थ्यासाठी एकच संगणक वापरणार.
- आसने, डेस्क, परीक्षा सभागृहाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणार.
- परीक्षा सभागृह हवेशीर असतील याची काळजी घेणार.

























































