
सामना ऑनलाईन । मुंबई
गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने कर्जपुरवठादारांकडून आणीबाणीसाठी मागितलेले 400 कोटी रुपये न मिळाल्याने अवघ्या पंचविशीतच दम तोडला. बुधवारी रात्री अमृतसर ते दिल्ली असे जेटच्या विमानाचे शेवटचे उड्डाण होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना माफक दरात ‘जॉय ऑफ फ्लाइंग’चे दर्शन देणाऱ्या जेटची अखेरी अशी तळमळत, सरकारदरबारी दयायाचना करत झाली.
तारणहार मिळालाच नाही
जेटला वाचवायला सरकार किंवा स्टेट बँक ऑफ इंडिच्या अध्यक्षतेखालील कोणतीही बँक पुढे न आल्यामुळे जेटची अखेर झाली. जेटला तारण्यासाठी जेट व्यवस्थापनाने तत्काळ 400 कोटींची मागणी केली होती, मात्र ही लाईफलाईन न मिळाल्यामुळे आज अखेर देशांतर्गत आणि परदेशातील उड्डाणे थांबवल्याचे जेट व्यवस्थापनाने सांगितले. या आधी 25 मार्चलाही व्यवस्थापनाने 1500 कोटी रुपयांची मागणी केली होती, मात्र ती मंजूर करण्यात आली नव्हती.
बंद पडलेली सातवी विमान कंपनी
2014 पासून 7 विमान कंपन्या बंद पडल्या असून त्यात जेट एअरवेजचा सातवा क्रमांक आहे. या आधी एअर कोस्टा, एअर कार्निव्हल, एअर डेक्कन, एअर ओदिशा, झूम एअर, एअर पेगासुस या कंपन्या बंद पडल्या आहेत, मात्र सरकार दावा करत आहे की, विमान क्षेत्र दुपटीने विस्तारले आहे.
एअर इंडियाला 35 हजार कोटींचे पॅकेज
जेट एअरवेजचा एकेकाळचा स्पर्धक असलेल्या फरार उद्योजक विजय मल्ल्यानेही ट्विटरवरून या सगळय़ाबद्दल सरकारला दोषी धरले आहे. ‘कोणे एके काळी जेट किंग फिशरचा मोठा स्पर्धक होता. त्यामुळे जेटचे मला वाईट वाटते. आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडियाला सरकार 35 हजार कोटींचे पॅकेज देऊन वाचवते आणि जेटसारख्या खासगी कंपनीकडे मात्र दुर्लक्ष करते. या भेदभावाकडे डोळेझाक करता येणार नाही.’ दरम्यान, विजय मल्ल्या म्हणाला की, मी सरकारी बँकांचे कर्ज फेडायला तयार आहे.’





























































