
कोरोनामुळे धूमधडाक्याच्या लग्नावर टाच आली आहे. तरीही लगीनघाई सुरूच आहे. संचारबंदीचे उल्लंघनाचे गुन्हे दाखल होत आहेत. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या उक्तीप्रमाणे कायद्याची चौकट पायदळी तुडवण्याचा गंभीर प्रकार कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथे घडला आहे.
एका 17 वर्ष 11 महिने वयाच्या मुलीशी बालविवाह करण्याचा घाट पोलिसांनी उधळून लावला असून याप्रकरणी दोन्ही कुटुंबातील पाच सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 12 मे रोजी सकाळी जेऊर पाटोदा कोपरगाव नारायण आगाजी अव्हाने आणि अल्काबाई नारायण अव्हाने यांनी त्यांची अल्पवयीन मुलगी सोनाली ही अल्पवयीन असताना तिचे लग्न विकास सोपान चव्हाण याच्याशी ठरवून आज रोजी माळ घालून लग्न करून देणार होते. याची पोलिसांना माहिती मिळाली होती. मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही आरोपी हा लग्न करण्यासाठी तयार होता.
तसेच त्याचे आई वडील सोपान आनंदा चव्हाण व सुलोचना सोपान चव्हाण हे त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी तयार झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हे लग्न रोखले. पोलीस पाटील हरीभाऊ सयाजी केकान यांच्या फिर्यादीवरून दोन्ही कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































