#JharkhandResults दीड वर्षात भाजपने महाराष्ट्रासह 7 राज्य गमावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून काँग्रेस, जेएमएम आणि राजद आघाडीने बहुमतापर्यंत मजल मारली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या काही तासांमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. सुरुवातीला दोन्ही पक्ष समान जागांवर आघाडीवर होते, मात्र काँग्रेसने मुसंडी मारत दुपारपर्यंत बहुमताच्या आकड्यापर्यंत मजल मारली. दुपारी तीन वाजेपर्यंत काँग्रेस आणि मित्रपक्ष 42 जागांवर आघाडीवर तर भाजप 28 जागांवर आघाडीवर होते.

सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजप पिछाडीवर पडली. त्यानंतर दुपारच्या सुमारास भाजपला दिलासा मिळाला, मात्र तरीही ते बहुमताच्या आकड्यापासून कोसो दूर आहेत. सध्या भाजप 28 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस-जेएमएम 42 जागांवर आघाडीवर आहे. यात 26, काँग्रेस 12 आणि राजद 4 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे झारखंडमध्ये काँग्रेस-जेएमएम सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भाजपसाठी हा मोठा धक्का असणार आहे. कारण गेल्या दीड वर्षात भाजपने महाराष्ट्रासह सात राज्ये गमावली आहेत.

2014 साली भारतीय जनता पक्ष प्रचंड बहुमताने केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांच्या विजयाचा वारू उधळला. 2014 ला केवळ सात राज्यांमध्ये सत्ता असणाऱ्या भाजपाने 2018 च्या शेवटपर्यंत देशातील 22 राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. मात्र 2018 च्या मध्यनंतर ही विजयी घौडदौड मंदावली.

भाजपने आपला बालेकिल्ला मानली जाणारी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड सारख्या राज्यांमधील सत्ता गमावली. तसेच आंध्रप्रदेशमध्येही तेलगू देसम पार्टीने भाजपपासून फारकत घेत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जम्मू-कश्मीरमध्येही डिसेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने तेथेही भाजप आणि पीडीपीचे सरकार बरखास्त झाले.

भाजपने गमावलेली राज्य –
1. मध्य प्रदेश
2. छत्तीसगड
3. राजस्थान
4. महाराष्ट्र
5. आंध्र प्रदेश
6. जम्मू-कश्मीर
7. झारखंड