झारखंडमध्ये मूल चोरीच्या संशयातून एकाची मारहाण करून हत्या

285

मूल चोरी केल्याच्या संशयातून जमावाने केलेल्या जबर मारहाणीत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना झारखंडमधील कोडरमा येथे घडली आहे. मृत व्यक्तिचे नाव सुनील यादव (वय 30) होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हजारीबाग जिल्ह्यात राहणार सुनील यादव पेशाने मजूर होता. तो कामाच्या शोधात कोडरमा येथे आला होता. जिथे रेल्वे वसाहतीत जमावाने सुनील याला मूल चोरीच्या संशयातून मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली आणि लोकांच्या तावडीतून सुनीलची मुक्तता केली. पोलिसांनी सुनीलला कोडरमा येथील रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, सुनील याचा भाऊ दिलीप यादव याने याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्याने आपल्या तक्रारीत आपल्या भावाच्या मृत्यूसाठी रेल्वेचे तीन अधिकारी दोषी असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असल्याचे तिलैया पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय कुमार सिंह यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या