एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने तरुणीचे घर जाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, ठाणे

प्राची झाडेची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या, नंतर मुंब्य्रात तरुणीच्या चेहऱ्यावर वार या घटनेतून ठाणे सावरत असतानाच एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने तरुणीचे घर जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. रितेश मेहरोल असे या माथेफिरूचे नाव असून तो ठाण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे.  सुदैवाने या घटनेत तरुणीसह तिचे अख्खे कुटुंब व नातेवाईक बालबाल बचावले आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यांत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर झालेला हा तिसरा हल्ला असल्याने ठाणेकर हादरले असून सुसंस्कृत ठाण्यात चाललंय तरी काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

4 ऑगस्ट 2018- एकतर्फी प्रेमातून पूर्व द्रुतगती महामार्गावर आकाश पवार या तरुणाने प्राची झाडे हिच्यावर चाकूने वार केले होते. त्यात तिचा दुर्दैवी अंत झाला होता.

16 सप्टेंबर 2018- लग्नाला नकार दिला म्हणून करण हुले या आरोपी माथेफिरूने तरुणीच्या कपाळावर, खांद्यावर, पोटावर सपासप दहा ते बारा वार करून पोबारा केला. 2 ऑक्टोबर 2018- खारटन परिसरात मामाच्या घरी राहण्यासाठी आलेल्या तरुणीचे एकतर्फी प्रेमातून घर जाळण्याचा प्रयत्न.

मुंबईतील वडाळा परिसरात राहणारी पीडित तरुणी ठाणे खारटन  येथील आपल्या मामाच्या घरी नेहमी यायची. यातूनच परिसरात राहणाऱ्या रितेश मेहरोलसोबत तिची दीड वर्षांपूर्वी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. मात्र रितेशची  आधीच दोन लग्न झाली असून त्याला मुलेही असल्याचे जेव्हा पीडितेला कळले तेव्हाच तिने त्याच्याशी सर्व संबंध तोडले. तरीही रितेशने तिचा पाठलाग सोडला नाही. व्हॉट्सअॅपवर त्याने तिच्यासोबतचे फोटो टाकले. याचा जाब विचारण्यासाठी पीडित तरुणीचे आईवडील रितेशच्या घरी पोहचले. याचा राग आल्याने माथेफिरू रितेशने बदला घेण्याचे ठरवले. रात्री उशीर झाल्याने पीडित तरुणी पालकांसह  मामाच्या घरी मुक्कामासाठी थांबली. याचा सुगावा लागताच रितेशने रात्री दीडच्या सुमारास एक्झॉस्ट फॅनच्या फटीतून पेट्रोलचे गोळे फेकले. सुदैवाने आग पसरण्याआधीच घरातल्या एका सदस्याने घर पेटत असल्याचे पाहिले आणि सर्वांनी बाहेर धाव घेतली. अग्निशमन दलाने आग विझवल्यानंतर आरोपी रितेश मेहरोल विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्याला पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेऊन अटक केली आहे.

मोठा अनर्थ टळला

पेट्रोलचे गोळे घरात फेकल्यानंतर वस्तूंनी पेट घ्यायला सुरुवात केली. आगीच्या झळाने एक सदस्य उठला आणि सर्वांनी बाहेर धाव घेतली. अन्यथा अनर्थ झाला असता. पीडितेच्या मामाचे घर लहान असून घटनेच्या वेळी नऊजण उपस्थित होते.