फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला टक्कर देण्यासाठी रिलायन्स ‘जिओ मार्ट’ सुरू करणार

हिंदुस्थानात ऑनलाईन खरेदीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट या दोन ई-कॉमर्स कंपन्या सध्या तेजीत असून त्यांना टक्कर देण्याचं रिलायन्सने ठरवलं आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीने ‘जिओ मार्ट’ ही ई-कॉमर्स कंपनी सुरू केली आहे. या ऑनलाईन विक्री करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून लॉग-इन करण्यासाठी जिओची मोबाईल, इंटरनेट सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना विनंती पाठवण्यास सुरुवात केली आहे. ‘देश की नई दुकान’ असे घोषवाक्य घेऊन ही कंपनी बाजारात उतरली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या भागापासून ही कंपनी विक्रीला सुरुवात करणार आहे.

रिलायन्स रिटेलने ‘जिओ मार्ट’ सुरू करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. येत्या काळात या ई-कॉमर्स कंपनीचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. जिओ ग्राहकांना या ई-कॉमर्सतर्फे डिस्काऊंट देण्यात येणार असल्याचं प्रलोभन दाखवत त्यांना आकर्षित करण्याचे रिलायन्सने प्रयत्न सुरू केले आहेत. जिओ मार्टसाठी नवे अॅपही सुरू केले जाणार आहे.

12 ऑगस्टला झालेल्या रिलायन्सच्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी लवकरच रिलायन्स कंपनी किराणा बाजाराचे स्वरुप बदलून टाकणार असल्याचे घोषित केले होते. रिलायन्सने जिओ मार्टला जगातील सर्वात मोठी ऑनलाईन टू ऑफलाईन सेवा पुरवणारी कंपनी बनविण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या