घाटकोपरला अण्णाभाऊ साठे, परळला डॉ. आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणार -जितेंद्र आव्हाड

582

मुंबईतील चिराग नगर-घाटकोपर येथे अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य असणारे घर व बीआयटी चाळ परळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या घराच्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागामार्फत राष्ट्रीय दर्जाची स्मारके उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. वांद्रे पूर्व येथील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) गृहनिर्माण भवन या मुख्यालयात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी म्हाडामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती आव्हाड यांनी घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना आव्हाड यांनी ही माहिती दिली.

यावेळी आव्हाड म्हणाले, ‘या दोन्ही स्मारकांसंदर्भात लवकरच पुढील कार्यवाहीला प्रारंभ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य असणाऱ्या घराच्या ठिकाणी सद्यस्थितीत राहत असलेल्या रहिवाशांचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या घराच्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन मुंबईत प्रकल्पग्रस्त म्हणून शासनातर्फे इतरत्र करण्यात येणार आहे. या दोन्ही स्मारकांना पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये म्हाडाच्या मोठ्या भूभागावर जुन्या वसाहती आहेत. या वसाहतींच्या पुनर्विकासातून मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे. या जुन्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासंदर्भात शासनातर्फे प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले. मध्यमवर्गीय मराठी माणसाचे घर घेण्याचे स्वप्नपूर्ती करणारी म्हणून म्हाडा या संस्थेकडे मोठ्या आशेने लोक पाहतात. म्हाडाच्या माध्यमातून गृहनिर्मितीच्या प्रक्रियेला वेग देण्याचा प्रयत्न करणार असून परवडणाऱ्या दरातील अधिकाधिक सदनिका उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. 45 दिवसांच्या आत फायलीचा निपटारा म्हाडामध्ये केला जात असून ही कौतुकास्पद बाब असल्याचे आव्हाड म्हणाले. यावेळी आव्हाड यांच्या हस्ते मुंबई मंडळाच्या निवासी कार्यकारी अभियंता (पुनर्विकास कक्ष) यांच्यासाठी विकसित आरइइ संगणकीय प्रणाली व मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्यासाठी म्हाडातर्फे विकसित ई-बिलिंग या संगणकीय प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.

मुंबई मंडळाच्या निवासी कार्यकारी अभियंता (पुनर्विकास कक्ष) यांच्यासाठी विकसित आरइइ संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुनर्विकासासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांनी प्रस्ताव सादर करावयाचा आहे. या संगणकीय प्रणालीमुळे पुनर्विकासासाठी ऑफर लेटर देणे, ना हरकत प्रमाणपत्र, त्रिपक्षीय करार, आरंभ प्रमाणपत्र (CC), भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. यावेळी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे मुख्य अभियंता-1 धीरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंता-2 संजय लाड, मुख्य अभियंता-3 सुनील जाधव, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी बी. राधाकृष्णन, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश लोखंडे, कोंकण मंडळाचे सभापती माधव कुसेकर, औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या