
शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने शनिवारी महामोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या पातळीवर तयारी केली जात आहे. सरकारविरोधात हा महामोर्चा काढला जात असला तरी हा महामोर्चा महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, मिंधे सरकारला जाग आणण्यासाठी, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी, अखंड महाराष्ट्रासाठी आणि युवकांचा रोजगार टिकवण्यासाठी काढला जाणार आहे. असे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
महामोर्चासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बसचे नियोजन सुरु आहे. त्यासाठी ते महामंडळाकडे बसची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांच्याकडे पोलिसांची एनओसी मागितल्याचे त्यांनी सांगितले. याआधी कधीही एनओसीची मागणी करण्यात आली नव्हती, मात्र आता महामोर्चा काढणार म्हणून कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अडवणूक केली जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून मुंबईत 17 रोजी महामोर्चा काढला जाणार आहे. त्यावरून सरकारवर आता जोरदार हल्लाबोल केला जात आहे.




























































