जीवन प्राधिकरणाच्या पाइपलाइनला धक्का लागू नये; शिवसेनेचा कोल्हापुरात आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते कागलदरम्यान सुरू असलेल्या कामांमुळे सातत्याने पाइपलाइन फुटून उचगाव-गांधीनगरसह 14 गावांचा पाणीपुरवठा तीन-चार दिवस बंद पडत आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरणाच्या या पाइपलाइनला कोणताही धक्का लागू नये, याबाबत तत्काळ संबंधित ठेकेदारास सूचना द्याव्यात. तसेच या पाइपलाइनला गळती लागली, तर 14 गावांतील नागरिकांना घेऊन, आपल्या कार्यालयासमोर तीक्र निदर्शने करण्याचा इशारा करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास देण्यात आला. यावेळी उजळाईवाडी येथील व्यवस्थापक चंद्रकांत भरडे यांना याबाबत निवेदन दिले.

करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, दीपक रेडेकर, राहुल गिरुले, योगेश लोहार, शरद माळी, उत्तम आडसूळ, संतोष चौगुले, दीपक पोपटाणी, दीपक अंकल, सुनील पारपानी, किशोर कामरा, अजित चव्हाण, आबा जाधव, प्रफुल्ल घोरपडे, मनोज कुरळे, दत्तात्रेय विभूते, राजू राठोड आदी शिवसैनिक उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, कागल ते कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, उचगाव, उजळाईवाडी आदी 14 गावांना गांधीनगर नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. उचगावसारख्या मोठय़ा गावालाही या योजनेचा आधार आहे. या गावासाठी अन्य पाण्याची पर्यायी व्यवस्था नाही; पण गेल्या दोन महिन्यांपासून सातारा ते कागल सहा पदरीकरणाचे काम सुरू असून, खोदाईमुळे तीन ते चार वेळा ही पाइपलाइन फुटण्याचे प्रकार घडले आहेत. आता ऐन उन्हामध्येही पाण्याची टंचाई या गावांना बसू लागली आहे. एकदा लागलेली गळती काढण्यासाठी दोन ते तीन दिवस लागत आहेत. या गावांना अन्य पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यामुळे महामार्गाचे कामकाज करताना पाइपलाइन फुटणार नाही, याची दक्षता घ्या; अन्यथा या 14 गावांतील ग्रामस्थांसोबत कार्यालयासमोर निदर्शने करणार, असे निवेदनात म्हटले आहे.

चंद्रकांत भरडे यांनी या पाइपलाइनला कसलाही धक्का लागणार नाही, याची सूचना संबंधित ठेकेदाराससह हायवे रस्त्यावर काम करणाऱया कर्मचाऱयांना देण्यात येईल. तसेच पाइपलाइनच्या बाबतीत योग्य खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.