अभिनेत्री दीपिका पदुकोण ‘मनरेगा’च्या कामावर, जॉब कार्डचा फोटो व्हायरल

हेडिंग वाचून बुचकळ्यात पडलात ना. पण हे खरे आहे. मध्यप्रदेश मधील खरगोन जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने दीपिका पदुकोणसह अन्य अभिनेत्रीचे फोटो ‘रोजगार ग्यारंटी जॉब कार्ड’वर लावून पैशांची अफरातफर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्राम पंचायतीचा सचिव आणि रोजगार सहाय्यक अधिकारी यांनी हा घोटाळा केला आहे. याबाबत ‘अमर उजाला’ने वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, जिल्ह्यातील ऑनलाईन जॉब कार्डावर ग्रामीण भागातील महिला-पुरुषांच्या जागी अभिनेत्री, अभिनेते यांचा फोटो लावण्यात आला. या कार्डवर मजुरीचे पैसेही जमा करण्यात आले. मात्र गावकऱ्यांना आपल्या नावावर पैसे जमा झाल्याचा सुगावा लागण्यापूर्वी ही रक्कम इतरत्र वळवण्यात आली. गावकरीही मनरेगाचा कामावर जात नसल्याने त्यांनाही याची माहिती मिळाली नाही.

गावातील 50 ते 60 एकर धारक शेतकऱ्याच्या नावावर कार्ड काढून पैशांची अफरातफर करण्यात आली. जवळपास 15 ते 16 कार्डवर अभिनेत्रीचे फोटो लावून पैसे काढण्यात आले. या प्रकरणी आयएएस अधिकारी आणि जिल्हा पंचायत सीईओ गौरव बेंगल यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या