‘बॅझबॉल’च्या आक्रमणामुळे आपला मूळ कसोटी खेळ विसरलेल्या ज्यो रुटला आपले अपयश धुऊन काढण्यासाठी पुन्हा एकदा कसोटी खेळाचीच साथ घ्यावी लागली आणि त्याने 226 चेंडूंत 106 धावांची कसोटी क्रिकेटला साजेशी खेळी करत चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडला 7 बाद 302 अशी समाधानकारक मजल मारून दिली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रुट 106 तर रॉबिन्सन 31 धावांवर खेळत होते.
बॅझबॉलपेक्षा आपला खेळ बरा
रुटने हिंदुस्थानात येण्याआधीच 135 कसोटी सामन्यांत 30 शतके ठोकली होती, मात्र त्यानंतर खेळल्या गेलेल्या शेवटच्या तीन कसोटींत तो ‘बॅझबॉल’च्या आक्रमणामुळे आपला मूळ खेळ विसरला होता. गेल्या तीन कसोटींत त्याने 29, 2, 5, 16, 18, 9 अशा खेळय़ा केल्या होत्या. म्हणजेच 3 कसोटींतील सहा डावांत त्याने केवळ 77 धावा केल्या होत्या. मात्र आज ‘बॅझबॉल’ला विश्रांती देत आपला कसोटी खेळ दाखवत त्याने संघालाही सावरले आणि आपले 31 वे कसोटी शतक झळकावले. सध्या खेळत असलेल्या फलंदाजापैकी केन विल्यमसन (32) आणि स्टीव्ह स्मिथ (32) हेच दोघे रुटच्या पुढे आहेत.
इंग्लंडने ‘बॅझबॉल’ टाळले
गेल्या दोन वर्षांत इंग्लंडने किती धक्के बसले तरी ‘बॅझबॉल’ सोडले नव्हते. त्यामुळे ते एकाही मालिकेत हरले नाही. मात्र हिंदुस्थानविरुद्ध सलग दोन पराभवांमुळे इंग्लिश क्रिकेट हादरल्याचे आज दिसले. इंग्लंडच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करताना षटकामागे पाच धाव काढल्या होत्या. मात्र सलग तीन हादरे बसल्यानंतर इंग्लंडचा संघ अस्थिर झाला आणि त्यांनी सावध खेळ सुरू केला. आजवर पाच ते सहाच्या सरासरीने धावा काढणाऱया इंग्लंडने पहिल्या दिवशी 3.35 धावांच्या सरासरीने केवळ 302 धावा केल्या आणि गेल्या दोन वर्षांत प्रथमच इंग्लिश फलंदाजांनी ‘बॅझबॉल’ला विश्रांती दिली.
रुटची आणखी एक ग्रेट इनिंग
आकाश दीपच्या एकाच षटकात दोन धक्के बसल्यानंतर फलंदाजीला आलेल्या ज्यो रुटने आज आपला ट्रक पूर्णपणे बदलला. गेल्या कसोटीत त्याने मारलेल्या रिव्हर्स स्वीपवर चोहोबाजूंनी जहाल टीका झाल्याने रुट आज आपला मूळ खेळावर परतला. तो आल्यानंतरही इंग्लंडचे फलंदाज धडाधड बाद होत होते, पण रुटने शांत आणि संयमी खेळ करत स्वतःला रोखले. उपाहारालाच इंग्लंडचा संघ बिथरला होता, मात्र दुसऱया सत्रात बेन पह्क्सच्या साथीने त्याने खेळाचे सारे गणितच बिघडवून टाकले. दोघांनीही दुसरे सत्र यशस्वीपणे खेळून काढत 86 धावांची भर घातली, मात्र तिसऱया सत्रात ही जोडी पह्डण्यात मोहम्मद सिराजला यश लाभले. रुट आणि पह्क्सने गेल्या सात डावांतील इंग्लंडची सर्वात मोठी भागी रचताना सहाव्या विकेटसाठी 113 धावांची भर घातली. सिराजनेच टॉम हार्टलीचे स्टंप उडवत हिंदुस्थानला सातवे यश मिळवून दिले. पण यानंतर रुटने ओली रॉबिन्सनसह 57 धावांची भागी रचली आणि इंग्लंडला तीनशेपार नेले. विशेष म्हणजे आज शतक पूर्ण झाल्यानंतर रुटने ना कोणते सेलिब्रेशन केले नाही ना बॅट उंचावून, ना हेल्मेट काढून आनंद व्यक्त केला. त्याने फक्त शांतपणे बॅट आपल्या संघ सहकाऱयांना दाखवली.
आकाशचे देदीप्यमान पदार्पण
गेल्या काही कसोटींत हिंदुस्थानच्या युवा खेळाडूंनी अफलातून पदार्पण करण्याची किमया रांचीतही कायम ठेवली. यशस्वी जैसवाल, सरफराज खानपाठोपाठ आज आकाश दीपनेही आपले जबरदस्त पदार्पण केले. जसप्रीत बुमराच्या विश्रांतीमुळे पदार्पणाची संधी लाभलेल्या आकाश दीपने पदार्पणाचे सोने करताना हिंदुस्थानला पहिले तीन विकेट मिळवून देत सनसनाटी निर्माण केली. त्याने आपल्या एकाच षटकात तीन चेंडूंत बेन डकेट (11) आणि ओली पोप (0) यांची विकेट घेत संस्मरणीय सुरुवात केली. त्याच्या हादऱयामुळे पहिल्या सत्रातच इंग्लंडचा अर्धा संघ 112 धावांत आटोपला होता आणि हिंदुस्थानला कसोटीवर पकड घेण्याची जबरदस्त संधी होती, मात्र हिंदुस्थानच्या यशात ज्यो रुटचा खेळ आडवा आला.
रुटचे विश्वविक्रमी शतक
‘बॅझबॉल’च्या आक्रमक खेळामुळे आपला नैसर्गिक खेळ विसरलेल्या ज्यो रुटने आज आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला आणि 31 वे विक्रमी शतक साजरे केले. हे त्याचे हिंदुस्थानविरुद्धचे विक्रमी दहावे शतक असून त्याने स्टीव्ह स्मिथच्या नऊ शतकांच्या विक्रमाला मोडीत काढले. रुटने हिंदुस्थानविरुद्ध 29 वी कसोटी खेळताना ही कामगिरी केली असून 2709 धावाही केल्या आहेत. हिंदुस्थानविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रमही रुटच्याच नावावर आहे. तसे एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतकांचा आणि धावांचा विश्वविक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर अबाधित आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध 37 कसोटी सामन्यांत 19 शतके ठोकताना 5028 धावा केल्या आहेत.