IND vs ENG – रुटने नांगर टाकला, 5 बाद 112 वरून इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला

रांचीमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटीमध्ये इंग्लंडने पहिल्या डावात सुरुवातीला झटपट विकेट गमावल्या. मात्र त्यानंतर ज्यो रुटने नांगर टाकला आणि इंग्लंडने 5 बाद 112 अशा अवस्थेतून धावांचा डोंगर उभारला. रुटने मधल्या तळाच्या खेळाडूंना हाताशी धरत इंग्लंडची धावसंख्या साडे तीनशे पार पोहोचवली. अखेरपर्यंत नाबाद राहिलेल्या रुटने 274 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 122 धावा ठोकल्या.

पहिल्या दिवशी पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या आकश दीपने पाहुण्यांना लागोपाठ तीन धक्के दिले. त्यानंतर अश्विन आणि जडेजानेही फिरकीचे जाळे विणल्याने इंग्लंडची अवस्था 5 बाद 112 अशी झाली. मात्र त्यानंतर एका बाजुने रुटने तर दुसऱ्या बाजुने फोक्सने किल्ला लढवत इंग्लंडला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र एका अप्रतिम चेंडूवर फोक्स जडेजाच्या हाती झेल देऊन बाद झाला आणि ही जोडी फुटली. त्यानंतर टॉम हार्टलीही लवकर बाद झाला.

इंग्लंडचा डाव 7 बाद 245 असा संकटात सापडलेला असताना रुट आणि रॉबिन्सनने पहिल्या दिवसाखेर अधिक पडझड न होऊ देता 7 बाद 305 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही दोघांनी वेगाने धावा वसूल केल्या. रॉबिन्सनने अर्धशतक ठोकले. मात्र जडेजाने एकामागोमाग एक 3 विकेट घेत इंग्लंडचा डाव गुंडाळला. हिंदुस्थानकडून रवींद्र जडेजाने 4, आकाश दीपने 3, मोहम्मद सिराजने 2 आणि आर. अश्विनने 1 विकेट घेतली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)