
सामना प्रतिनिधी । राहुरी
मोटरसायकल चोरीच्या घटनेवरून राहुरी शहरातील नागरीक तसेच पत्रकाराला झालेल्या हाणामारीच्या निषेधार्थ आज गुरूवारी राहुरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येवून निषेध मोर्चा काढण्यात आला.
राहुरी शहराच्या शांततेला गालबोट लावणाऱ्या हाणामारीच्या घटनेने राहुरी शहरात बुधवार सायंकाळ पासून तणावपूर्ण परीस्थिती निर्माण झाली होती. पोलीस उपअधिक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी कोम्बिंग ऑपरेशन करत हाणामारीच्या घटनेतील सहा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज गुरूवारी राहुरी शहरात कडकडीत बंद पाळून हजारो नागरीकांनी निषेध फेरी काढली. नगर मनमाड राज्य मार्गावरून शिवाजी चौक, शनीमंदीर मार्गे निषेध फेरी राहुरी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर या फेरीचे सभेत रूपांतर झाले.
यावेळी राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष रावसाहेब यादवराव तनपुरे, शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर, गंगापूर येथील उद्योजक मच्छिंद्र देवकर, व्यापारी संघटनेचे प्रकाश पारख, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले, महिला राष्ट्रवादी कॉग्रेसच्या निर्मला मालपाणी, शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, संभाजी ब्रिगेडचे मच्छिंद्र गुंड, वकील संघटनेचे राहुल शेटे, पत्रकार राजेंद्र वाडेकर, संत झावरे,रफिक शेख, सूनिल भुजाडी, विलास कुलकर्णी आदींनी या घटनेचा निषेध करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. यावेळी पत्रकार संघटनेच्या वतीने पोलीस उप अधिक्षक राहुल मदने यांना निवेदन देऊन पत्रकार संरक्षण कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली.
याप्रसंगी व्यापारी असोसिएशन, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, मराठा एकीकरण समिती, प्रहार संघटना, यशवंत सेना, डॉक्टर असोसिएशन व पत्रकार संघटनेसह हजारो नागरिक उपस्थित होते. दरम्यान आज शहरातील गुरूवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्याने सायंकाळी पाच वाजेपर्यंत बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता.शहरात दिवसभर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. संजय मोहन मोटे, पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न व लूटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी बुधवारी रात्री उशिराने विजय रामदास आहेर, अक्षय भास्कर बर्डे,अमोल उत्तम माळी, प्रविण रावसाहेब वाघ, रामा रमेश माळी,आकाश सोमनाथ माळी यांना ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. तर इतर पाच ते सहा हल्लेखोरांचा राहुरी पोलीस शोध घेत आहेत.





























































