
सामना प्रतिनिधी । कुडाळ
कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने २०१८-१९ वर्षाचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. व्याधकार कै. ग.म. तथा भैयासाहेब वालावलकर जिल्हास्तर पत्रकारिता पुरस्कार सावंतवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार वसंत केसरकर यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार कै वसंत दळवी ग्रामीण पत्रकार पुरस्कार गावराई येथील नंदकुमार विष्णू आयरे यांना तर कै. ग.म. तथा भैयासाहेब वालावलकर छायाचित्रकार पुरस्कार खारेपाटण येथील रमेश जामसंडेकर यांना जाहीर झाला आहे.
कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आहे पुरस्कार जाहीर करण्यात आले. लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. कुडाळ तालुका पत्रकार समितीची सभा समितीचे उपाध्यक्ष आनंद मर्गज यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या या बैठकीला संजीवनी देसाई, आनंद मर्गज, निलेश जोशी, अजय सावंत, प्रमोद म्हाडगूत, रवी गावडे, प्रमोद ठाकूर, काशीराम गायकवाड, विलास कुडाळकर, प्रसाद राणे, रजनीकांत कदम, सुनील आचरेकर, संतोष तांबे उपस्थित होते. या बैठकीत समिती मार्फत देण्यात येणाऱ्या पत्रकारिता पुरस्कारांबाबत चर्चा झाली. त्याप्रमाणे व्याधकार कै. ग.म. तथा भैयासाहेब वालावलकर जिल्हास्तर पत्रकारिता पुरस्कार सावंतवाडीचे वसंत उर्फ अण्णा केसरकर याना जाहीर करण्यात आला. वसंत उर्फ अण्णा केसरकर हे साप्ताहिक ‘हरहर महादेव’ व दैनिक ‘सिंधुप्रवास’ याचे संपादक आहेत. गेली ४५ वर्षे ते पत्रकारितेत कार्यरत आहेत.
सावंतवाडी पत्रकार समिती आणि जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य आहेत. गोवा मुक्ती संग्रामात देखील त्यांनी सहभाग घेतला होता. सीमालढ्यात त्यांनी तुरुंगवास भोगला आहे. विविध संस्थांचे ते अध्यक्ष आहेत. विविध सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, सहकारी संस्था यांच्याशी ते निगडित आहेत. शासनाने त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार देऊन गौरव केला आहे. ते एक प्रगत शेतकरी सुद्धा आहेत.
कै. वसंत दळवी ग्रामीण पुरस्कार गावराई येथील नंदकुमार विष्णू आयरे याना जाहीर झाला आहे. नंदकुमार आयरे यांनी २००४ मध्ये दै. सागर, कोकणसाद, पुण्यनगरी या वृत्तपत्रातून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. जून २००६ पासून गेली बारा वर्षे ते दै. सकाळ या वृत्तपत्रात जिल्हा मुख्यालयात वृत्त संकलनाचे काम करत आहेत.
कै. ग.म. तथा भैयासाहेब वालावलकर छायाचित्रकार पुरस्कार खारेपाटण येथील रमेश जामसंडेकर याना जाहीर झाला आहे. श्री. जामसंडेकर हे गेली ३५ वर्ष व्यावसायिक आणि वृत्तपत्रांसाठी फोटोग्राफी करत आहेत. खारेपाटण येथे त्यांचा सिनेटोन फोटो स्टुडिओ आहे. दै. सकाळ, दै. तरुण भारत, दै. पुढारी या वृत्तपत्रांसाठी त्यांनी काम केले आहे. सध्या ते दै. पुढारीसाठी वृत्त संकलनाचे देखील काम करत आहेत. श्री. जामसंडेकर याना १९९० मध्ये छायाचित्रणासाठीचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. त्याच बरोबर लोकप्रभा मुंबईने देखील १९९१ यामध्ये छायचित्रण पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला आहे. १९९२ मध्ये झालेल्या सिंधू महोत्सवात देखील त्यांना ‘उत्सव’ या छायाचित्रासाठी प्रथम क्रमांक मिळाला होता. खारेपाटणमध्ये ते फोटोग्राफीचे प्रशिक्षण देखील देतात. कणकवली तालुका पत्रकार समितीचे ते विद्यमान उपाध्यक्ष आहेत. या पुरस्कारांचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे.
































































