सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक आणि मानसिक छळाचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप एका महिलेने केल्यामुळे खळबळ उडाली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणी घेण्यात आली असून त्यासाठी विशेष खंडपीठ स्थापन केले आहे. सरन्यायाधीशांविरुद्धच सुनावणी होण्याची इतिहासातील पहिलीच घटना आहे. दरम्यान, हे आरोप केवळ माझ्यापुरते नाहीत तर हिंदुस्थानची न्यायव्यवस्थाच अस्थिर करण्याचा व्यापक कट आहे. यामागे बडी शक्ती आहे, असे सरन्यायाधीश गोगोई यांनी म्हटले आहे.

सरन्यायाधीश गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी 35 वर्षीय महिला ही सर्वोच्च न्यायालयाची माजी कर्मचारी आहे. डिसेंबर 2018 मध्ये तिला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. काही न्यूज पोर्टल्सनी कोणतीही खातरजमा न करता महिलेच्या आरोपांचे वृत्त छापले यावर न्यायमूर्ती मिश्रा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणतीही पडताळणी केल्याशिवाय आणि सत्य जाणून घेतल्याशिवाय महिलेच्या तक्रारीचे वृत्त प्रसिद्ध करू नये असे सांगतानाच मिश्रा म्हणाले, काय प्रसिद्ध करायचे आणि काय नाही हे शेवटी मीडियाने आपल्या विवेकानुसार ठरवावे. न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य याला धक्का पोहचत आहे याचाही विचार मीडियाने करावा.

विशेष खंडपीठ

तातडीने सरन्यायाधीश गोगोई यांनीच विशेष खंडपीठ स्थापन करून यावर तातडीने सुनावणी सुरू करण्याचे आदेश दिले.शनिवारी सुट्टी असूनही सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सुनावणीवेळी सरन्यायाधीश खंडपीठातून बाहेर पडले आणि न्यायमूर्ती मिश्रा हे याबाबत ‘ऑर्डर’ देतील असे स्पष्ट केले. संबंधित महिलेने सर्वोच्च न्यायालयाच्या 22 न्यायमूर्तींना सविस्तर पत्र पाठवून सरन्यायाधीश गोगोई यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. हे वृत्त स्क्रोल, लिफलेट, कारवाँ या काही न्यूज पोर्टल्सनी प्रसिद्ध केल्यामुळे खळबळ उडाली.

सचोटीने न्यायव्यवस्थेची सेवा केली त्याचे इनाम मिळते आहे – सरन्यायाधीश

  • आरोपांमुळे सरन्यायाधीश गोगोई व्यथित झाले. आपली बाजू मांडताना गोगोई म्हणाले, 20 वर्षे सचोटीने न्यायव्यवस्थेची सेवा केली त्याचे इनाम मला मिळत आहे.
  • कोणत्याही पैशाच्या घोटाळ्यात मला कोणीही अडकवू शकत नाही. त्यामुळे माझ्यावर आरोप करण्यासाठी हा मार्ग निवडला आहे.
  • माझी संपत्ती फक्त 6.80 लाख रुपये आहे. 40 लाखांचा पीएफ जमा आहे.
  • देशाची न्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा व्यापक कट रचला जात आहे. यामागे मोठय़ा शक्ती आहेत. आरोप करणाऱ्या महिलेची वर्तणूक आधीपासूनच आक्षेपार्ह असून तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.
  • येत्या काही आठवडय़ांमध्ये मी काही महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी करणार आहे. तसेच हा महिना लोकसभा निवडणुकीचा आहे. मी सात महिने या खुर्चीवर (सरन्यायाधीश पद) आहे. माझे न्यायदानाचे काम मी कोणत्याही दडपणाविना करीत राहणार. मी माझे कर्तव्य सचोटीने पार पाडणार.
  • नोटिसीला उत्तर देण्यासाठी मला 10 तासांहून कमी वेळ देण्यात आला आहे. खरोखर या देशाची न्यायव्यवस्था धोक्यात आली हे सांगण्याची वेळ सरन्यायाधीशांवरच आली आहे.

आरोप काय?

  • सर्वोच्च न्यायालयात कर्मचारी असलेली महिला गोगोई यांच्या घरी काम करीत होती. ऑक्टोबर 18 मध्ये दोन वेळा गोगोई यांनी शारीरिक छळ केल्याचा आरोप पत्रात केला.
  • गोगोई यांच्या गैरवर्तनाला विरोध केल्यामुळे डिसेंबर 18 ला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आली.  परवानगीशिवाय सुट्टी घेतल्याचे कारण यासाठी देण्यात आले.
  • या महिलेचा पती आणि दीर हे दोघेही दिल्ली पोलीसमध्ये हेड कॉन्स्टेबल होते. त्या दोघांनाही 28 डिसेंबर 18 ला बडतर्फ केले.
  • 11 जानेवारी 19 ला गोगोई यांच्या घरी बोलवले. गोगोई यांच्या पत्नीने आपल्याला जमिनीवर नाक घासून माफी मागायला लावली.
  • 14 जानेवारी 2019 ला कोणतेही कारण न देता आणखी एका अपंग दिराला सर्वोच्च न्यायालयाच्या नोकरीतून बडतर्फ केले, असे या महिलेने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
  • 9 मार्च 2019 ला संबंधित महिला कुटुंबासह राजस्थानात मूळगावी गेली असताना तिथे दिल्ली पोलीस पोहचले. सर्वोच्च न्यायालयात नोकरी देतो म्हणून 50 हजारांचा गंडा घातल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी महिलेसह पती, दीर, त्याची पत्नी यांना ताब्यात घेतले आणि दिल्लीत आणून तिलक मार्ग पोलीस ठाण्यात डांबले. तेथे पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ केली. अन्न-पाणी दिले नाही असा आरोप या पत्रात केला आहे.

या खटल्यांवर गोगोई यांच्यासमोर सुनावणी

  • राफेलच्या खटल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विधानाबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी राहुल यांना पुढील आठवडय़ात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • पश्चिम बंगालमधील शारदा चीटफंड घोटाळ्याप्रकरणी माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या कोठडीची मागणी सीबीआयने केली आहे. याप्रकरणी उद्या सुनावणी आहे.
  • पी. एम. नरेंद्र मोदी या सिनेमावर निवडणूक आयोगाच्या बंदीला आव्हान देण्यात आले आहे. त्यावर पुढील आठवडय़ात सुनावणी.
  • आसाममध्ये लागू केलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व विधेयकाप्रकरणी दाखल याचिकेवरही उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
  • निवडणूक मतदान यंत्रातील बिघाड आणि गैरप्रकार याबाबत  दाखल याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.