महिलांसाठी ज्युडो महत्त्वाचे, महाराष्ट्र ज्युडो असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. धनंजय भोसले यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्युडोमध्ये सेल्फ डिफेन्स अर्थातच संरक्षणाचा धडा मिळतो. त्यामुळे या खेळाचे प्राथमिक ज्ञान घेतल्यानंतरही जीवनात पुढे गेल्यानंतर प्रत्येकाला त्याचा फायदा होऊ शकतो. देशातील वाईट प्रवृत्तींवर लक्ष देत महिलांनाही स्वतःच्या रक्षणासाठी या खेळाची मोठी मदत मिळू शकते, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे महाराष्ट्र ज्युडो असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. धनंजय भोसले यांनी. यावेळी दैनिक ‘सामना’ने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ज्युडोशी निगडित इतर बाबींवर दृष्टिक्षेप टाकला.

त्यानंतरच खेळ सुरू होईल

ज्युडो हा बॉडी कॉण्टॅक्ट खेळ आहे. त्यामुळे या खेळाच्या सरावाला सुरुवात केल्यानंतरही अडचण निर्माण होऊ शकते. एखाद्याला जरी लागण झाली असेल तर तिथे उपस्थितांनाही संसर्ग होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर ज्युडोच्या स्पर्धाच नव्हे, तर सरावाची गॅरण्टी आता तरी देता येणार नाही. कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतरच हा खेळ व्यवस्थित सुरू होऊ शकतो, असे धनंजय भोसले यांना वाटते.

स्पॉन्सरचा अभाव

आपल्या येथे पालक जागृत नाहीत. क्रिवेट, फुटबॉल, टेनिस यांसारख्या खेळांना पटकन स्पॉन्सर मिळतात, पण ज्युडो या खेळाला स्पॉन्सरही नीट मिळत नाहीत. त्यामुळे खेळाडूंना प्रॉपर डाएट व सराव मिळू शकत नाही. मात्र तरीही महाराष्ट्रातील खेळाडूंनी देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकून द्यावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मत धनंजय भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.

कोरोनाचा फटका बसला

कोरोना विषाणूचा फटका इतर खेळांप्रमाणे ज्युडो या खेळालाही बसलाय. कोरोना व लॉकडाऊनमुळे सर्व स्पर्धा सध्या तरी स्थगित करण्यात आल्या आहेत. खेळाडूंचा सराव बंद आहे. जागतिक स्तरावरही ज्युडोच्या हालचाली होत नाहीत, अशी खंत धनंजय भोसले यांनी व्यक्त केली.  

ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन

कोरोनाच्या काळात ज्युडोपटूंना सराव व स्पर्धांपासून दूर राहावे लागले, पण आमच्या असोसिएशनकडून ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोन गट तयार करून या खेळाची स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत 150 खेळाडूंनी सहभाग घेतला, असेही धनंजय भोसले यावेळी आवर्जून म्हणाले.  

आता जास्त जिल्ह्यांमध्ये खेळला जातोय

2004 सालापर्यंत ज्युडो हा खेळ महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये खेळला जात होता, पण आता ज्युडो या खेळाचा महाराष्ट्रात चांगल्या प्रमाणात प्रचार व प्रसार झाला आहे. हा खेळ 29 जिल्ह्यांमध्ये खेळला जात आहे तसेच या खेळासाठी लागणारा ड्रेस हा कमीतकमी पाच हजार रुपयांना मिळतो. ग्रामीण भागांतील खेळाडूंसाठी थोडं अवघड असतं, पण प्रकाश मुळे हे शिंपी आहेत. ते आपल्यासाठी कमीतकमी किमतीत खेळाडूंचा ड्रेस बनवून देतात, असे धनंजय भोसले यांनी सांगितले.