12 हजारांत विकायचा बँक खाते

टास्कच्या नावाखाली वृद्धाची फसवणूकप्रकरणी एकाला जुहू पोलिसांनी अटक केली. मोहन प्रदीप मंडल असे त्याचे नाव आहे. फसवणुकीचे पैसे त्याच्या खात्यात आले होते. त्याने 12 हजार रुपये घेऊन त्याचे बँक खाते सायबर ठगांना वापरण्यास दिले होते.

जुहू येथे राहणारे तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. जानेवारी महिन्यात त्याना एक साहित्य कुरीअर करायचे होते. त्यामुळे त्याने गुगलवर एक नंबर शोधला. त्या नंबरवर त्याने फोन केला. त्यानंतर ठगाने त्यांना मेसेज केला. टेलिग्राम ऍप्सवर गुगल रिह्यूसाठी दोन रुपयेप्रमाणे पैसे देण्यास सांगितले. त्या मेसेजमध्ये एक लिंक होती. त्यानंतर त्यांना टेलिग्राम ग्रूपवर जोडले गेले. ठगाने त्यांना 1 हजार रुपये भरून टास्क पूर्ण करण्यास सांगितला. पेड टास्कच्या नावाखाली ठगाने त्याच्याकडून 1 लाख रुपये उकळले. भरलेले पैसे त्यांच्या खात्यात जमा होत नव्हते. हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. जुहू पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.

सहाय्यक आयुक्त महेश मुगुटराव यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सुनील जाधव यांच्या पथकातील उपनिरीक्षक अनुराग दीक्षित आदी पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना एका बँक खात्याची माहिती मिळाली. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. पोलिसांचे पथक पश्चिम बंगाल येथे गेले. तेथे पोलिसांनी सापळा रचून मंडलला ताब्यात घेऊन अटक केली. मंडलने त्याचे बँक खाते सायबर ठगांना 12 हजार रुपयांत विकले होते. त्याच्या खात्यात एकूण 4 लाख रुपये आले होते. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.