
किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेत महाराष्ट्राच्या वाको मुंबई किकबॉक्सिंग असोसिएशनने चमकदार कामगिरी केली. वाको मुंबईच्या तब्बल 10 खेळाडूंनी 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य अशी पदके पटकावून राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा दबदबा कायम राखला आहे. महाराष्ट्राच्या टीमने तिसऱया क्रमांकाच्या चॅम्पियनशिप ट्रॉफीवर नाव कोरले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकांवर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हिमाचल प्रदेश राज्यातील नौनी, सोलन येथील परमार युनिव्हर्सिटीच्या मैदानावर ज्युनियर्स नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप-2025 स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडली. स्पर्धेत सर्व राज्यांचे प्रतिभावान खेळाडू सहभागी झाले होते. 22 ते 26 सप्टेंबरदरम्यान झालेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंनी असाधारण कामगिरी करीत दहा पदकांची कमाई केली. त्यात 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे. वाको मुंबईचे अध्यक्ष विशाल सिंग आणि सरचिटणीस प्रशांत कांबळे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली ही ऐतिहासिक कामगिरी करण्यात यश मिळाले. वाको महाराष्ट्राचे अध्यक्ष नीलेश शेलार आणि सरचिटणीस धीरज वाघमारे यांनी टीमला मार्गदर्शन केले. खेळाडूंना योद्धा फायटिंग ऍण्ड फिटनेस अकादमी (विशाल सिंग), जेडीएस एमएमए जिम (अदनान मुकरी), फिगर फॅक्टरी एमएमए जिम (अदनान मुकरी), स्ट्रायकर एमएमए 2.0 अकादमी (सतीश सिंग) या प्रशिक्षक व त्यांच्या अकादमींनी उत्तम प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय पातळीवरील यशाचा मार्ग सुकर केला.
राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू
आर्यन संजित (सुवर्ण), तनिश संडगे (सुवर्ण), अर्णव शर्मा (सुवर्ण), शर्विल आचरेकर (सुवर्ण), सम्राह शेख (सुवर्ण), आयशा शेख (सुवर्ण), कृतिका शेट्टी (रौप्य), आर्यन तळेकर (रौप्य), अवनिश शर्मा (रौप्य), अलिशा शेख (कांस्य).
खेळाडूंचा अमाप उत्साह अन् शिस्त!
आमच्या खेळाडूंनी अविश्वसनीय उत्साह आणि शिस्त दाखवली. राष्ट्रीय पातळीवरील यश म्हणजे खेळाडूंच्या कठोर परिश्रमाचे आणि त्यांना मिळालेल्या प्रोत्साहन व पाठिंब्याचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया वाको मुंबईचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक विशाल सिंग यांनी दिली. वाको महाराष्ट्राचे अध्यक्ष नीलेश शेलार यांनी, आमचे ध्येय नेहमीच तळागाळातील प्रतिभेचा विकास करणे आणि त्यांना राष्ट्रीय पातळीवर चमकवणे हे राहिले आहे, असे नमूद केले.