
मुलांमध्ये रायगड, पालघर, पिंपरी-चिंचवड, तर मुलींमध्ये ठाणे शहर, पुणे ग्रामीण आणि लातूर या संघांनी ‘आदित्य चषक’ युवा (मुले व मुली) महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत तिसऱ्या दिवशी बाद फेरीकडे आगेकूच केली आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशक्ती महिला संघाच्या वतीने बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. सायंकाळच्या सत्रात मुलांच्या रायगड संघाने सोलापूर संघावर 40-30 अशी मात करीत विजय मिळविला.
मध्यंतराला रायगड संघाकडे 23-14 अशी आघाडी होती. रायगड संघाच्या यतीन घरत, सार्थ सातमकर यांनी जोरदार चढाया करीत विजय साकारला. यश वाघवले यांनी पकडी घेतल्या. सोलापूरच्या रोमेश जाधव व संग्रामसिंग सारक यांनी चांगल्या चढाया केल्या, तर आदर्श गायकवाडने पकडी घेतल्या. पालघर संघाने जालना संघावर 49-38 असा विजय मिळविला. मध्यांतराला पालघर संघाकडे 17-16 अशी निसटती आघाडी होती. पालघर संघाच्या करण रामगडे, जित मारडे यांनी जोरदार हल्ला चढवत जालना संघाचा बचाव मोडून काढला. समवेद पाटील याने चांगल्या पकडी केल्या. जालन्याच्या रितेश अडे याने एकाकी लढत दिली, तर युवराज राठोड याने पकडी घेतल्या.
पिंपरी-चिंचवड व पुणे शहर संघ यांच्यात झालेला अटीतटीचा सामना 47-47 असा समान गुणसंख्येवर संपला. त्यामुळे त्यांना साखळीत 1-1 गुण मिळाला. मध्यांतराला पिंपरी चिंचवड संघाकडे 32-20 अशी आघाडी होती. पिंपरी चिंचवडच्या पार्थ चाजड, श्लोक वडेवालकर यांनी आक्रमक चढाया केल्या. याशीर सुतार यांनी पकडी घेतल्या. पुणे शहर संघाच्या विशाल गाढवे व अथर्व सोनावणे यांनी चांगला प्रतिकार केला, तर यश पवार याने पकडी घेत चांगली साथ दिली. मुलांच्या इतर सामन्यात रत्नागिरीने नांदेडचा 40-29, मुंबई उपनगर पूर्वने सिंधुदुर्गचा 50-23, तर नाशिक शहर संघाने हिंगोलीचा 39-18 असा धुव्वा उडविला.
मुलींमध्ये ठाणे शहर व सांगली यांच्यात अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात ठाणे शहर संघाने सांगली संघावर 27-25 असा निसटता विजय मिळविला. मध्यंतराला ठाणे शहर संघाकडे 16-10 अशी आघाडी होती. ठाणे शहरच्या आरती शेळके हिने चौफेर आक्रमण करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर जान्हवी पार्टे हिने पकडी घेत सुरेख साथ दिली. सांगलीच्या सनी कोळी हिने चांगल्या चढाया केल्या, तर तबसुम पठाण हिने पकडी घेतल्या.