
जयेंद्र लोंढे,[email protected]
कबड्डी… मातीतील अस्सल देशी खेळ. आपल्या मराठमोळ्या खेळांची, खेळाडूंची ओळख. खरे पाहता हा हिंदुस्थानचा प्राचीन खेळ. आपल्या देशातील प्रत्येक राज्यात थोडय़ाफार फरकाने हा खेळ खेळला जातो. महाराष्ट्रातील पैलवान आपल्या अंगची रग जिरवण्यासाठी हा खेळ खेळत असत. होळीच्या वेळी हा खेळ खेळला जाई. मुका असलेला हा खेळ हळूहळू बोलका होऊ लागला. ‘सू सू सूर’, ‘राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की’, ‘हुतूतू’ अशा वेगवेगळ्या शब्दोच्चारांनी हा खेळ बोलका झाला. सुरुवातीला महाराष्ट्रात या खेळाला हुतूतू हे नाव दिले गेले. हुतूतू म्हणजे गोंधळ, धांगडधिंगा. पुढे मराठी माणसाच्या प्रयत्नातून या खेळासाठी नियम तयार केले गेले. यातून या खेळाला ‘कबड्डी’ हे नाव मिळाले. महाराष्ट्राने कबड्डीला एका सुरात बांधले. नियमबद्ध केले. 1990 साली बीजिंग येथे झालेल्या एशियाडपासून कबड्डीचा आशियायी खेळांच्या स्पर्धेत समावेश करण्यात आला. कबड्डी आंतरराष्ट्रीय झाली याचे श्रेय महाराष्ट्राला आहे. क्रिकेट व यासारख्या इतर विदेशी खेळांच्या ग्लॅमरमुळे हा अस्सल देशी खेळ झाकोळला गेला. पण प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डीला पुन्हा ग्लॅमर मिळाले. अनेक गुणी खेळाडू यातून पुढे आले. अनुप पुमार, रिषांक देवाडिगा आणि अजून कितीतरी… यापैकी अनुप पुमार आता निवृत्त होतोय. कबड्डीचे ग्लॅमर अनेक होतकरू खेळाडूंना खुणावू लागलंय. प्रो कबड्डीमुळे जरी या खेळाला ग्लॅमर मिळाले असले तरी मूळ मातीतील कबड्डी जपली गेली पाहिजे. महिला खेळाडूंचा विचार
प्रो-कबड्डीसाठी व्हावा. या सगळ्या विषयांवर कबड्डी खेळाडू विशाल माने याने मांडलेले विचार…
अनुप पुमारच्या अचानक निवृत्तीबाबत काय सांगशील…
– माझ्या कबड्डी कारकीर्दीत त्याच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे. कबड्डीपटूच नव्हे तर एक आदर्श व्यक्ती म्हणूनही त्याची ओळख आहे. तो निवृत्त होईल याची चाहूल लागली होती. मात्र प्रत्यक्षात निवृत्त झाल्यावर माझ्यासह फझेल अत्राचली या इराणी खेळाडूच्या डोळ्यांतून पाणी आले. यावरूनच त्याची महानता समजून येते.
आजच्या कबड्डीविषयी सांग…
कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ. मात्र याआधी तो मर्यादित लोकांपर्यंत पोहोचला होता. प्रो-कबड्डी स्पर्धेमुळे हा खेळ सातासमुद्रापार पोहोचला आहे. कबड्डीपटूंचे क्रिकेटपटूंप्रमाणे चाहते निर्माण झाले आहेत. आपला खेळ मोठी झेप घेऊ लागलाय, याचा अभिमान वाटतो.
मॅटवरील कबड्डी अन् मातीतील कबड्डी…
– माती व मॅट या दोन्ही प्रकारच्या कबड्डीत जमीन-अस्मानचा फरक आहे. मातीमध्ये कबड्डी खेळणाऱया खेळाडूला मॅटवर खेळायला जायच्याआधी सराव महत्त्वाचा असतो. तो थेट मॅटवर खेळायला गेल्यास त्याला दुखापत होऊ शकते. प्रो-कबड्डी स्पर्धेआधी आम्हीही ‘वर्प आऊट’ करतो. यामध्ये रनिंग, हर्डल्स, झिग झॅग या सरावाचा समावेश असतो. यामुळे शरीराचा तोल कायम राहतो. मॅट बुटांमुळे दबला जातो. त्यामुळे मॅटवर खेळणारा खेळाडू नेहमीच तंदुरुस्त असायला हवा.
कबड्डीला मिळालेल्या ग्लॅमरमुळे खेळाची प्रगती होईल का?
नक्कीच होणार. कबड्डी हा खेळ झपाटय़ाने प्रगतिपथावर रूढ झालाय. हिंदुस्थानचा खेळ बघत बघत इराणने कबड्डीत कात टाकलीय. आजूबाजूच्या देशांचा खेळ पाहतच खेळांचा विकास होत असतो. युरोपमध्येही हा खेळ पुढे येईल. तेथील देशांनी खेळत राहायला हवे. आपल्या प्रशिक्षकांनी तेथे जाऊन युवकांना मार्गदर्शन करायला हवे. अर्थात यासाठी त्यांना मानधनही चांगले देणे आवश्यक आहे.
प्रो-कबड्डी लीगमध्ये मुलींची स्पर्धा पुन्हा सुरू होईल का?
– प्रो-कबड्डी लीगमध्ये एका मोसमात मुलींची स्पर्धा घेण्यात आली. याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याचे मुख्य कारण होते यामध्ये फक्त आपल्या देशातल्याच मुलींचा सहभाग होता. परदेशातील मुलीही यामध्ये खेळल्या असत्या तर चित्र वेगळे दिसले असते. आगामी काळात प्रो-कबड्डी लीगमध्ये मुलींची स्पर्धा होऊ शकते. इराणसह इतर देशांच्या मुलींना यामध्ये संधी दिल्यास या स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद लाभेल यात शंका नाही.
होतकरूंना काय सांगशील?
जीवनात खेळ हा अविभाज्य घटक आहे. प्रत्येकाने खेळत राहायला हवे. तरच आपण कार्यक्षम राहतो. मेहनत, शिस्त, लक्ष्य या तीन गोष्टींवर लक्ष पेंद्रीत केल्यास आपण कोणतीही लढाई हरू शकत नाही.
नवा संकल्प…नवा प्रकल्प…
– जानेवारी महिन्याच्या अखेरीस रोहे येथे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राने ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे आता आमचे लक्ष्य आहे ते हे जेतेपद राखण्याकडे. शिवाय 2019 मध्येच वर्ल्ड कप होणार आहे. यामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यास आम्ही सर्व खेळाडू सर्वस्व पणाला लावू.
तरुणाईचा सहभाग व प्रतिसाद कसा आहे?
प्रो-कबड्डी लीगमुळे कबड्डीचा कायापालट झाला आहे. तरुणाईचा प्रतिसाद जबरदस्त आहेच, पण शाळकरी मुलांचा प्रतिसाद पाहून भारावून गेलो आहे. शाळकरी मुलांनी आम्हाला गाडीत किंवा रस्त्यावर पाहिले की आमची नावं घेऊन ओरडतात. आमच्या लहानपणी आम्हाला एवढं वेड नव्हतं. या खेळामध्ये करीअर करता येऊ शकते हेही पालकांना कळू लागले आहे. त्यामुळे त्यांचाही पाठिंबा मुलांना मिळू लागलाय. क्रिकेटपटूंप्रमाणेच हिंदुस्थानात मानाचे स्थान कबड्डीपटूंना ते मिळू लागले आहे.
कबड्डीला आज चांगल्या खेळाडूंची गरज आहे…
खूपच गरज आहे. कबड्डीच्या मॅटवर तसेच बाहेरही चांगला कबड्डीपटू असणे अत्यंत आवश्यक आहे. सचिन तेंडुलकरने जे क्रिकेटसाठी केले, तेच कबड्डीपटूंनीही करायला हवे. सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या हितासाठी जे केले, त्याचा अर्धा वाटा उचलला तरी कबड्डी खेळ आणखी उत्तुंग झेप घेईल.
कबड्डी ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी काय करता येईल?
संघटना आपल्या परीने कार्य करीत आहे. कबड्डीचा वर्ल्ड कप होऊ लागलाय, पण आपल्या देशातील प्रत्येक राज्यातील माध्यमांनी या खेळाची दखल घ्यायला हवी. महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळतोय, पण बंगालमधील इंग्रजी दैनिकात या खेळाविषयी एक ओळही वाचायला मिळत नाही. आपल्या देशातच नव्हे तर देशाबाहेरही कबड्डीचा प्रसार, प्रचार व्हायला हवा. क्रिकेटप्रमाणे कबड्डीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा व्हायला हव्यात. द्विपक्षीय मालिका, तिरंगी, चौरंगी मालिका वारंवार झाल्यास टीव्हीवर सामने पाहणाऱया कबड्डीप्रेमींची संख्या वाढेल. आपसूकच कबड्डी जागतिक पातळीवर पोहचून यशस्वी होईल.

























































