
विद्यमान सरकारने आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून केवळ चुनावी जुमले करू नये. नव्या घोषणा करण्यापेक्षा आधी मंजूर झालेल्या योजनांना पुरेसा निधी द्यावा, अशी मागणी शिवसेना आमदार पैलास पाटील यांनी आज विधानसभेत केली.
अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना कैलास पाटील यांनी त्यांच्या धाराशीव मतदारसंघातील विविध प्रश्नांना वाचा फोडली. गरीबांना विविध योजनांमधून घरकुल देण्याची घोषणा सरकार करते, पण यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेत तीन-चार वर्षे झाली तरी मंजूर घरकुलांना निधी मिळत नाही याकडे कैलास पाटील यांनी लक्ष वेधले.
धाराशीवच्या कसबे तडवळे येथे 1941 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महार मांग वतनदार परिषद घेतली होती. तिथे स्मारक उभारण्याचे शासनाने ठरवले होते. त्यासाठी तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे स्थलांतर करावे लागणार आहे. ती स्थलांतरित करून स्मारक उभारण्यासाठी 12 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे. मात्र स्मारकासाठी फक्त 96 लाख रुपये मंजूर आहे. तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यासाठी निधी वाढवून द्यावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली.
अहिल्याबाई होळकरांच्या रखडलेल्या स्मारकाचा मुद्दाही त्यांनी मांडला. गतिमान सरकार म्हणून मिरवणारे सरकार महापुरुषांच्या स्मारकांच्या बाबतीत गतिमान का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. धाराशीवमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असतानाही त्याला निधीची तरतूद करण्यात आलेली नाही हेसुद्धा आमदार पाटील यांनी शासनाच्या लक्षात आणून दिले.



























































