
सामना ऑनलाईन । हावडा
‘प. बंगालमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेचे धमकीचे पत्र सापडणे आश्चर्यजनक आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अयोग्य नितीमुळे हे झाले आहे. ममता बॅनर्जी यांना हटवले नाही तर इसिस बंगालमध्ये प्रवेश करेल आणि बंगालची स्थिती जम्मू-कश्मीरसारखी होईल’, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी दिला आहे. हावडा येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले असताना त्यांनी हे वक्तव्य केले.
लवकरच येतोय, बंगालमध्ये इसिसचे पोस्टर्स, हाय अलर्ट जारी
बंगालमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेने ठिकठिकाणी बंगाली भाषेतील पोस्टर्स लावले असून त्यात लवकरच येतोय (‘शीघ्रई आसछी, इंशाअल्लाह’।) असे लिहिण्यात आले आहे. याबाबत बोलताना विजयवर्गीय म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या चुकीच्या धोरणांमुळे बंगालवर धोक्याची टांगती तलवार आहे. बंगालमधील लोकांना हे समजले पाहिले. आम्हाला येथे 23 जागा जिंकण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे, परंतु आता वाटत आहे येथे आम्ही 30 पेक्षा जास्त जागा जिंकू. 23 मे रोजी ममता बॅनर्जी यांना तोंड दाखवण्याची जागा राहणार नाही, असेही विजयवर्गीय यावेळी म्हणाले.
Kailash Vijayvargiya, BJP: If Mamata ji stays, Islamic State (ISIS) can enter West Bengal anytime. It’ll become like J&K. It is because of her appeasement politics that people related to terror activities have made their base in the border-states & ISIS threat is a proof of that. pic.twitter.com/j2znRhYWyU
— ANI (@ANI) April 28, 2019
ईव्हीएमवर भाजपचे नाव लिहिण्यात आल्याच्या प्रश्नावर बोलताना विजयवर्गीय म्हणाले की, याप्रकरणी ममता बॅनर्जी यांचा खोटा चेहरा समोर आला आहे. विरोधकांना हे कळून चुकले आहे की आपला पराभव होणार आहे. त्यामुळे ईव्हीएमवर शंका उपस्थित करून खोटे आरोप करण्यात येत आहेत. ईव्हीएमवर कमळाचे चिन्ह असल्याने किंवा भाजपचे नाव लिहिले असल्याने पक्षाला कोणताही फायदा होणार नाही. परंतु आता त्यांना पराभवाची भीती वाटत असून ते लोक काहीतरी कारणं शोधत असल्याचा टोला विजयवर्गीय यांनी लगावला.



























































