प्राचीन चांदीची नाणी विकण्याच्या बहाण्याने बोलवून करायची ‘हात की सफाई’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकांना आणि व्यापाऱ्यांना विविध प्रलोभने दाखवत चोरट्यांनी फसवण्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतात. तरही अनेकजण चोरट्यांच्या प्रलोभनांना बळी पडत आहेत. चोरटे दाखवत असलेल्या प्रलोभनांच्या सत्यतेबाबत कोणताही विचार करण्यात येत नसल्याने अशा घटना वाढल्या आहेत. बिहारच्या कैमूर जिल्ह्यातून अशाच एका टोळीतील महिलेला अटक करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना प्राचीन चांदीचे नाणी विकण्याच्या बहाण्याने ही महिला घरी बोलवत होती. त्यानंतर टोळीतील इतरजण व्यापाऱ्याला मारहाण करत त्याच्याकडील मुद्देमाल लूटत असत. या महिलेला अटक झाल्याने आणखी काही गुन्हे उघड होणार आहेत.

बिहारच्या कैमूर जिल्ह्यात व्यापाऱ्यांना प्रलोभन दाखवून लुटणारी टोळी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या टोळीतील 12 जणांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, व्यापाऱ्यांना घरी बोलवणारी ही महिला वर्षभरापासून फरार होती. अखेर पोलिसांनी तिला अटक केली आहे. त्यामुळे अनेक गुन्ह्यांचा उलगडा होणार आहे. कैमूर जिल्ह्यातील खरौली गावात चोरट्यांचा हा धंदा सुरू होता. टोळीतील सदस्य आसपासच्या गावातील सराफ आणि व्यापाऱ्यांना भेटून आमच्या गावात मोठ्या प्रमाणात चांदीची प्राचीन नाणी सापडली आहेत. आम्हाला ती लवकरात लवकर विकायची आहेत, असे सांगायची. व्यापारी या प्रलोभनाला भुलल्यानर मामी उर्फ बासमती देवी व्यापाऱ्यांना पैसे घेऊन आपल्या घरी बोलवत असे.

चांदीची प्राचीन नाणी खरेदी करण्यासाठी व्यापारी मोठी रक्कम घेऊन बासमती देवीच्या घरी पोहचत असत. त्यानंतर बासमती देवी काही नाणी व्यापाऱ्यांना दाखवत घरात नेत असे. त्यानंतर टोळीतील इतरजण व्यापाऱ्याला मारहाण करत आणि त्याच्याकडील पैसे आणि मुद्देमला लूटत असत. तसेच घटनेची माहिती पोलिसांना दिल्यास ठार मारण्याची धमकीही देण्यात असे. अशा घटना वाढल्यानंतर पोलिसांनी टोळीतील 12 जणांना अटक केली होती. वर्षभरापासून फरार असलेल्या बासमती देवीलाही आता अटक झाली आहे.

खरौली गावातील तनवीरने आपल्याला या गोष्टी करायला सांगितल्याचे बासमती देवीने म्हटले आहे. आपल्याला पुढे करून ही टोळी लूट करत असल्याचे तिने सांगितले. व्यापाऱ्यांकडून लुटलेला पैसा तेच घेत असून आपल्याला फक्त एक हजार रुपये मिळत असल्याचेही तिने सांगितले. या टोळीत आणखी कोणाचा समावेश आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात त्यांच्या घरात चांदीची काही नाणी आणि 6 लाख 30 हजार रुपये सापडले आहेत. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.