काळ्या खणीच्या सुशोभीकरणासाठी डीपीसीकडून सव्वा कोटी, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली शहरातील काळ्या खणीच्या सुशोभीकरणाला गती आली आहे. जिल्हा नियोजन समितीकडून यासाठी एक कोटी 28 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली.

सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात दहा एकराहून अधिक जागेत काळी खण आहे. या खणीच्या सुशोभीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. काँग्रेस नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी या खणीचे सुशोभिकरण करण्याची मागणी केली होती. आयुक्त नितीन कापडणीस यांनी पदभार हाती घेतल्यापासून या खणीच्या सुशोभीकरण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केलेले आहे. नुकतेच या खणीलगत सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. खणीत विविध रंगांची उधळण करणारा कारंजाही सुरू आहे. या खणीला संरक्षक भिंत नसल्याने अनेक वेळा अपघात होत होते. आयुक्तांनी तातडीने या खणीला तारेचे कंपाउंड केले आहे. उर्वरित कामांसाठी 1 कोटी 28 लाख रुपयांचा प्रस्ताव महापालिकेकडून जिल्हाधिकाऱयांकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱयांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता काळी खण सुशोभीकरण मार्गी लागेल. काळ्या खणीच्या सुशोभीकरणासाठी वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांच्याकडून आराखडा तयार करण्यात आला आहे. संपूर्ण सुशोभिकरणासाठी 35 कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाकडे दहा कोटी, तर केंद्राकडे 25 कोटींचा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचेही महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.