कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवायची आहे का? नागपंचमीला करून बघा हे सोपे उपाय…

>> योगेश जोशी

आपल्या संस्कृतीत श्रावण महिना पवित्र मानला जात असून हा महिना शिवशंकराच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. तसेच श्रावण महिन्यात शुक्ल पंचमीला येणाऱ्या नागपंचमीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवशंकर आणि नाग यांचा जवळचा संबंध आहे. शंकराच्या गळ्यात नेहमी वासुकी नावाचा नाग असतो. तर महाविष्णु शेषनागावर योगनिद्रा घेतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीत नागांना विशेष महत्त्व आहे.

पौराणिक मान्यता असलेले नाग किंवा सर्प हे शेतकऱ्यांचे मित्र मानले जातात. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी साजरी करण्यात येते. तसेच पौराणिक मान्यतेनुसार नागपंचमीला काही उपाय केल्यास कालसर्पदोष, अर्धकालसर्पदोष तसेच राहू, केतू ग्रहांच्या अशुभ फलांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. जीवनात सर्व सुरळीत सुरू असताना अचानक अडचणींची मालिका सुरू होतो. पूर्ण होत असलेले काम अचानक रखडते. ही सर्व कालसर्पयोग, अर्धकालसर्प योग, राहू आणि केतू ग्रहाच्या अशुभ फले मानली जातात. यापासून मुक्तीसाठी नागपंचमीला भोलेनाथांसह नागपूजा केल्यास या अशुभ फलांपासून मुक्ती मिळते, असे सांगण्यात येते.

या वर्षी नाग पंचमी 29 जुलै रोजी येत आहे. नागपंचमीला भगवान शिवाचे अलंकार असलेल्या नागांची पूजा केली जाते. नागांची पूजा करून आध्यात्मिक शक्ती, सिद्धी, अपार धन प्राप्त करता येते, अशी मान्यता आहे. राहु-केतूची कुंडलीत स्थिती चांगली नसली, त्याचे अशुभ फळ मिळथ असले तर या दिवशी नागांची विशेष पूजा करून या दोषापासून मुक्ती मिळवत लाभ मिळवता येतो.

नाग पंचमीच्या दिवशी भगवान शिवाला काही विशेष वस्तू अर्पण केल्याने कालसर्प दोष आणि जीवनातील इतर अडचणींपासूनही मुक्तता मिळते. नाग पंचमीच्या दिवशी शिवलिंगावर मध अर्पण करणे शुभ मानले जाते. शिवलिंगावर मध अर्पण केल्याने कौटुंबिक कलह आणि शनिदोष दूर होतो असे मानले जाते. नाग पंचमीच्या दिवशी शिवलिंगावर धोतऱ्याचे फूल अर्पण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. तसेच भगवान शिवाचे कृपाशीर्वाद कायम राहतात.

नाग पंचमीच्या दिवशी शिवलिंगावर दूध अर्पण करणे देखील शुभ आहे. ब्रह्म मुहूर्तावर शिवलिंगावर दूध अर्पण करणे सर्वात लाभदायक मानले जाते. नाग पंचमीच्या दिवशी शिवलिंगावर अक्षता आणि चंदन अर्पण करणेही शुभ मानले जाते. शिवलिंगावर अक्षत चंदन अर्पण केल्याने जीवनात सकारात्मकता येते असे म्हटले जाते. तसेच यावेळी भगवान शंकरासोबत नागांचीही अशाच प्रकारे पूजा केल्यास कालसर्पदोष, अर्धकालसर्पदोष, राहू-केतूची अशुभ फले यापासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे.