कल्याण-भिवंडीत हजारो नागरिकांची नावं मतदार यादीतून गायब

निवडणूक म्हटली की मतदान हे हमखास ठरलेलं असतं. पण, या प्रक्रियेत डोकेदुखी ठरतो तो मतदार याद्यांचा घोळ. गेल्या अनेक निवडणुकांपासून मतदार याद्यांचे घोळ होणं आणि त्यातून नावं गायब होणं हे प्रकार सुरू आहेत. निवडणूक आयोगाने आपल्या सावळ्या गोंधळाची ही परंपरा 2024च्या लोकसभा निवडणुकीतही कायम राखल्याचं पाहायला मिळालं आहे. कल्याण आणि भिवंडी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात सुमारे 80 हजार ते 1 लाख मतदारांची नावंच गायब झाल्याचं उघड झालं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत या गंभीर गोंधळावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

कल्याण आणि भिवंडी मतदार संघात मतदान करण्यासाठी नागरिक सकाळपासून उत्साहाने केंद्रांवर पोहोचले. सोबत ओळखपत्र म्हणून मतदार कार्डही होतं. मात्र, केंद्रांवर पोहोचल्यानंतर मतदार यादीत त्यांचं नावच नसल्याचं त्यांना आढळलं. अनेक मतदार याद्या तपासल्यानंतरही त्यांना आपलं नाव आढळलं नाही. त्यामुळे त्यांना मतदान न करताच परतावं लागलं. कल्याणमध्ये 80 हजार मतदारांची नावंच यादीत नसल्याचं आढळलं असून भिवंडीत हाच आकडा 1 लाख इतका आहे.

कल्याण पश्चिमेला मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात मतदार केंद्र होतं, तिथे नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करून निवडणूक आयोगाच्या या गोंधळाचा निषेध केला. मतदानाच्या दिवसापर्यंत फोन आणि मेसेजवरून वारंवार मतदानाचं आवाहन करणारा आयोग मतदार याद्याच गायब कसा करतो, असा सवाल नागरिकांनी केला आहे.