भाजपने मिंध्याची लायकी दाखवली, कल्याणच्या जिल्हाप्रमुखला मोदींच्या स्टेजवर नो एन्ट्री

शिवसेनेशी गद्दारी करून भाजपच्या वळचणीला गेलेल्या मिंधे गटाला आता भाजपने लायकी दाखवण्यास सुरुवात केली आहे. कल्याणला आज चार वाजता होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत मिंधे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांना स्टेजवर एन्ट्री नाकारण्यात आली आहे. प्रोटोकॉलचे कारण देऊन त्यांना स्टेजवरील निमंत्रितांच्या रांगेत स्थान देण्यात आले नाही. यामुळे सभेच्या तोंडावरच भाजप आणि मिंधे गटात ठिणगी पडली आहे. स्टेजवर स्थान नाकारल्याने मोरे यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवला आहे.

माझ्या हाताखालचे स्टेजवर…हा माझा अपमान

अरविंद मोरे यांना जाणीवपूर्वक स्टेजवर स्थान दिले नसल्याची चर्चा आहे. यावर मोरे यांनी दिलेले स्टेटमेंट पाहता मिंधे गटातील अंतर्गत गतबाजीला पुष्टी मिळते. मी जिल्हाप्रमुख असून स्टेजवर मला स्थान नाही मात्र माझ्या हाताखाली काम करत असलेले शहरप्रमुख रवी पाटील, आमदार विश्वनाथ भोईर यांना स्टेजवर स्थान दिले आहे. हा माझा अपमान आहे. त्यामुळे मी पदाचा राजीनामा देत असल्याचे मोरे यांनी प्रतिक्रिया दिली.