तंगड्यात तंगडं घालायचं आणि नावंही ठेवायची हे आता बंद करा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावले

केंद्र सरकारच्या संस्थांकडे राज्याची अनेक कामे अडकून पडली आहेत. काम करणाऱयांच्या तंगडय़ात तंगडं घालून त्याला पुढे जाऊ द्यायचे नाही आणि दुसरीकडे नावंही ठेवायची हे आता बंद करा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विरोधकांना ठणकावून सांगितले. कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी काहीही कमी पडू देणार नाही आणि या शहरांच्या विकासाची गतीही कमी होऊ देणार नाही, असे वचनच उद्धव ठाकरे यांनी दिले.

कल्याणमधील बहुचर्चित नवीन पत्रीपुलाचे लोकार्पण आणि स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पाचे (सॅटिस) ऑनलाइन भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना नव्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या. कल्याण पूर्व – पश्चिम जोडणारा पत्रीपूल हा वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने 2018 मध्ये जमीनदोस्त करण्यात आला. हा पूल ब्रिटिशकालीन होता. कल्याण रेल्वे मार्गावर हा पूल असल्याने कल्याण-शीळ मार्गाला जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कोरोना काळात रेल्वे आणि एमएसआरडीसीने कालबद्ध आणि नियोजनबद्ध काम केल्याने पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले.

सॅटिसमधून सॅटिसफॅक्शन मिळेल – आदित्य ठाकरे

कल्याण-डोंबिवलीकर हे स्मार्ट सिटीजन्स असल्याचे काैतुकोद्गार पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले. राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे सांगतानाच कल्याण स्थानक परिसर विकासाचा नारळ आज फुटला आहे. हा सॅटिस प्रकल्प कल्याण-डोंबिवलीकरांना सॅटिसफॅक्शन मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्मार्टसिटी प्रकल्पातून कल्याण-डोंबिवलीत महत्त्वाची कामे होत आहेत. काही कामे पूर्ण झाली आहेत, काही प्रगतिपथावर आहेत. नजीकच्या काळात कल्याण-डोंबिवलीचा चेहरामोहरा बदलून जाणार असून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जे जे करावे लागेल त्यासाठी सरकार पूर्ण ताकदीने पालिकेच्या पाठीशी राहील, असा शब्द त्यांनी दिला. नजीकच्या काळात स्मार्ट सिटी – स्मार्ट एमएमआरडीए हा प्रकल्प आकाराला येणार असून तज्ञांची कमिटी त्यावर काम करत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

विकासात तू तू मै मै कशाला?

केंद्र सरकार असो की राज्य सरकार, विकासकामातील अडथळे दूर होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कोणत्याही पातळीवर आपल्यात तू – तू मैं मैं होता कामा नये, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. कल्याणचा पत्रीपूल पूर्ण झाला त्याचप्रमाणे अन्य विकासकामे मार्गी लावणे ही आमची जबाबदारी आहे. कल्याण-डोंबिवलीच्या विकासाची गती कमी होणार नाही, असे वचन त्यांनी दिले. पत्रीपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर कल्याण रेल्वे स्थानक परिसर विकासकामाचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले.

भगवा तलावाचे ‘कागदोपत्री’ नामकरण करा!

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना पालिकेला विकासनिधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली. पालिकेच्या कागदोपत्री काळा तलावाचे नाव भगवा तलाव करावे, असे निर्देश त्यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रीपूल उभारताना आलेल्या अडथळ्यांची माहिती दिली. कितीही समस्या आल्या तरी वेळेत पूल उभा करून लोकांचा विश्वास सार्थ ठरवल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख विजय साळवी, खासदार कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, रवींद्र चव्हाण, राजू पाटील, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माजी महापौर विनिता राणे, प्रकाश पेणकर, दीपेश म्हात्रे, मनोज चौधरी, सचिन बासरे, विजया पोटे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या