
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भारी पडताना दिसत आहेत. एका ताज्या सर्वेक्षणानुसार, कमला हॅरिस यांना ट्रम्प यांच्यापेक्षा 4 टक्के जास्त मते मिळाली आहेत. ही आघाडी फार मोठी नसली तरी निवडणुकीत नक्कीच महत्वपूर्ण ठरणार आहे.
सर्वेक्षणानुसार, कमला हॅरिस यांना 49 टक्के मतं मिळाली. तर ट्रम्प यांना 45 टक्के मतं मिळाली. जुलै महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात 43 टक्के मतं मिळवून ट्रम्प आघाडीवर होते. ताज्या सर्वेक्षणात हॅरिस पुढे गेल्याने डेमोक्रेटिक पक्षाचा उत्साह वाढला आहे. नोव्हेंबरमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये तगडी लढत होईल, असे संकेत मिळत आहेत. मिशिगन, पेन्सिलेन्विया, विस्कॉन्सिन, नॉर्थ पॅरोलिना, जॉर्जिया या राज्यांमध्ये हॅरिस-ट्रम्प यांच्यात कडवी झुंज होईल.
टेन्शन वाढले
कमला हॅरिस यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पक्षाचे टेन्शन वाढले आहे. ट्रम्प सतत कमला हॅरिस यांच्या योग्यतेवर सवाल उपस्थित करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी हॅरिस यांच्यावर वांशिक टिप्पणी केली होती.
30 हजार डेमोक्रेट्स एकत्र येणार
डेमोक्रेटिक्स नॅशनल कन्वेन्शनमध्ये 30 हजारांहून अधिक डेमोक्रेट्स एकत्र येतील. राष्ट्राध्यक्ष जो बायडन, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन परिषदेला मागदर्शन करतील. अमेरिकेच्या 50 राज्यांतून डेमोक्रेट्स येतील. ते राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हॅरिस आणि उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार टीम वाल्टज यांचे समर्थन करतील. दोघे भविष्यासाठी चांगले काम करतील.
डेमोक्रेटिक पक्षात उत्साहाची लाट
राष्ट्राध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांचे नाव घोषित झाल्यापासून डेमोक्रेटीक पक्षामध्ये ऊर्जा संचारली आहे. डेमोक्रेटीक नॅशनल कमिटीचे अध्यक्ष जॅमी हॅरिसन यांनी पक्षामध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले. ‘डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यासाठी असे वातावरण गरजेचे आहे. ट्रम्प देशात भाती पसरवण्याचे आणि देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. कमला हॅरिस महान नेता आहेत. त्यांचे अभियान जोरदार आहे,’ असे हॅरिसन म्हणाले.
चार वर्षांतून एकदा होणारे डेमोक्रेटिक नॅशनल कन्वेन्शन सोमवारपासून शिकागो येथे सुरू झालेय. यावेळी डेमोक्रेटीक पक्षाचे जुनेजाणते सर्व नेते उपस्थित राहतील. त्यांच्यासमारे कमला हॅरिस यांचे भाषण होईल.





























































