
गेली अनेक वर्षे रखडलेल्या दक्षिण मुंबईतील कामाठीपुराचा समूह पुनर्विकास लवकरच मार्गी लागणार आहे. रहिवाशांच्या पुनर्वसनानंतर विकासकाकडून म्हाडाला 500 चौरस फुटांची तब्बल एक हजार घरे उपलब्ध होणार आहेत. लॉटरीच्या माध्यमातून या घरांची विक्री केली जाणार आहे.
दक्षिण मुंबईतील 34 एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुरा येथे सुमारे 6625 निवासी व 1376 अनिवासी असे एकूण 8001 रहिवासी वास्तव्यास असून 800 जमीन मालक आहेत. या वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सीमार्फत (सी अॅण्ड डी) करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेत एएटीके कन्स्ट्रक्शनने बाजी मारली असून म्हाडातर्फे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली आहे. राज्य शासनाची मंजुरी मिळताच प्रत्यक्ष पुनर्विकासाला सुरुवात होणार आहे.
रहिवासी आणि इमारत मालकांच्या पुनर्वसनानंतर विकासक जेवढे विक्रीयोग्य बांधकाम करेल त्यातील 8.25 टक्के क्षेत्रफळ म्हाडाला बांधून मिळणार आहे. म्हणजेच सुमारे 900 ते एक हजार घरे म्हाडाला उपलब्ध होतील, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
रहिवाशांना मिळणार 25 हजार रुपये भाडे
पुनर्वसनासाठी कामाठीपुरा येथील इमारती रिक्त करण्याची आणि रहिवाशांना भाडे देण्याची जबाबदारी विकासकावर असणार आहे. विकासकाकडून दरमहा रहिवाशांना 25 हजार रुपये भाडय़ाचा पर्याय देण्यात आला असून सुरुवातीला अकरा महिन्यांचे आगाऊ भाडे एकत्रित देण्यात येईल, असेही अधिकाऱयाने सांगितले.
























































