
कांदिवलीत आज (रविवारी) पहाटे एक दोन मजली चाळ कोसळल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत ढिगार्याखाली अडकलेल्या बारा जणांना वाचवण्यात यश आले.
कांदिवली पश्चिम येथील साबरिया मशिदीच्या मागे ही दीपज्योती चाळ आहे. रविवारी पहाटे 5.15 च्या सुमारास या चाळीचे काही रूम अचानक कोसळले. पहाटेच्या वेळी घडलेल्या घटनेमुळे खोलीतील काही रहिवासी कोसळलेल्या ढिगार्याखाली अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. या बचावकार्यात बारा जणांना ढिगार्याखालून सुखरूप पाहेर काढले. या दुर्घनेनंतर बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीमलाही बोलावण्यात आले होते. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.


























































