कानिफनाथ महाराजांची रंगपंचमी यंदा भाविकांविना, मंदिराकडे येणारे रस्ते प्रशासनाकडून बंद; मढीत शुकशुकाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील मढी येथील कानिफनाथांची रंगपंचमीच्या दिवशी होणारी यात्रा आज भाविकांविना पार पडली. मोजक्याच विश्वस्त व पुजाऱयांच्या उपस्थितीत नाथांच्या समाधीची पूजा करून मंदिर बंद करण्यात आले. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक नाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात. मात्र, कोरोनामुळे आज मढी येथे शुकशुकाट पाहावयास मिळाला. मुख्य मंदिराकडे येणारे सर्व रस्ते प्रशासनाने बंद केल्याने तुरळक संख्येने आलेल्या भाविकांना मंदिराच्या कळसाचे लांबून दर्शन घेऊन माघारी फिरावे लागले.

रंगपंचमी ते फुलोरबाग या तीन टप्प्यांत मढी येथील यात्रा संपन्न होत असली, तरीही रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतल्याने या दिवसाला नाथभक्तांच्या दृष्टीने मोठे महत्त्व असते. दरवर्षी या दिवशी राज्यासह परराज्यातील भाविक आवर्जून नाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात. मात्र, चालू वर्षी कोरोनाच्या संकटामुळे आज मढी येथील मंदिर व गावात शुकशुकाट पाहावयास मिळाला. आज सकाळी मोजक्याच विश्वस्त व पुजाऱयांच्या उपस्थितीत नाथांच्या समाधीची पूजा केल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले.

मुख्य मंदिराकडे येणारे चारही रस्ते आज बंद करण्यात येऊन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय दरवर्षी जिह्यातील सर्व आगारातून एसटी बसेस सोडण्यात येत असतात. मात्र, आज एकही बस सोडण्यात आली नाही. काही भाविक स्वतःच्या वाहनाने मढी येथे आले; परंतु त्यांना मंदिराच्या कळसाचे लांबून दर्शन घेऊन माघारी जावे लागले. कानिफनाथांनी आपल्या संपूर्ण हयातीत भटक्या समाजाचे प्रतिनिधित्व केल्याने कुडमुडे जोशी, म्हसनजोगी, कंजारभाट, वैदू, बैरागी, गोपाळ, भिल्ल, पारधी या भटक्या समाजातील भाविक मोठय़ा संख्येने मढी येथे येतात. या समाजातील तुरळक भाविक वगळता इतरांनी यात्रेकडे पाठ फिरवली.

प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर व पोलीस निरीक्षक रणजित ढेरे आज दिवसभर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

रेवडीविक्रेत्यांना फटका; गाढवाचा बाजारही पडला ओस

मढी येथील यात्रेत रेवडीची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. मात्र, चालू वर्षी यात्रा भरणार नाही हे माहीत असल्याने रेवडीचे उत्पादनच करण्यात आले नाही. त्यामुळे रेवडी विक्रेत्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. मढी यात्रेतील गाढवांचा बाजार हा आकर्षणाचा विषय असतो. मात्र, चालूवर्षी गाढवांच्या विक्रेत्यांनी गाढवेच विक्रीस न आणल्याने काठेवाडी व गावरान गाढवांचा बाजारही ओस पडल्याचे दिसून आले. या यात्रेत रेवडी, दवणा वनस्पती, खेळणी, नाथांच्या प्रतिमा व मूर्ती, अस्तन्यासाठी लागणारे बांबू याची मोठी विक्री होते. मात्र, यात्राच बंद असल्याने या विक्रेत्यांना मोठा फटका बसला.

इतिहासात पहिल्यांदाच मंदिराच्या कळसाला एकही काठी लावली नाही

आजच्या दिवशी विविध गावांतील भाविक वाजतगाजत अस्तन्या घेऊन येतात व नाथांच्या मंदिराच्या कळसाला टेकवतात. मात्र, आज मुख्य मंदिरच बंद असल्याने मंदिराच्या इतिहासात प्रथमच एकही काठी नाथांच्या मंदिराच्या कळसाला लावण्यात आली नाही. या यात्रेपासून मढी देवस्थान व मढी ग्रामपंचायत तसेच परिवहन मंडळाला चांगले उत्पन्न मिळते. मात्र, यंदा मढी देवस्थान व ग्रामपंचायत तसेच परिवहन मंडळाला कोणतेही उत्पन्न मिळाले नाही