
बीसीसीआयचे एथिक्स पदाधिकारी डी. के. जैन यांच्याकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर शांता रंगास्वामी यांनी क्रिकेट सल्लागार समितीतील (सीएसी) सदस्यपदाचा राजीनामा दिला. आता या समितीचे प्रमुख कपिल देव यांनीही बुधवारी पदाचा राजीनामा दिला आहे. मध्य प्रदेश क्रिकेट संघाच्या संजीव गुप्ता यांनी क्रिकेट सल्लागार समितीविरोधात तक्रार केली होती. याप्रसंगी क्रिकेट सल्लागार समितीविरोधात एक व्यक्ती आणि दोन कामे म्हणजेच हितसंबंधाचा मुद्दा उपस्थित केला गेला.
टीम इंडियाचा कोच निवडण्यासाठी क्रिकेट सल्लागार समितीची निवड करण्यात आली होती. यामध्ये कपिलदेव, शांता रंगास्वामी व अंशुमन गायकवाड यांचा समावेश होता, मात्र संजीव गुप्ता यांनी तक्रार केल्यानंतर डी. के. जैन यांनी समितीतील सदस्यांना नोटीस पाठवली. दरम्यान, बीसीसीआयच्या कायदेशीर समितीकडून तिघांनाही क्लीन चिट देण्यात आली होती. मात्र शांता रंगास्वामी व कपिलदेव यांच्यानंतर अंशुमन गायकवाडही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
त्यांना फक्त कोच निवडीसाठी नियुक्त केले होते – विनोद राय
क्रिकेट सल्लागार समितीत कपिलदेव, शांता रंगास्वामी व अंशुमन गायकवाड यांची निवड करण्यात आली होती. या तिघांनी फक्त हिंदुस्थानी संघाचा कोच निवडायचा होता. त्यामुळे हितसंबंधाचा प्रश्न येथे उद्भवतच नाही, असे स्पष्टीकरण प्रशासकीय समितीचे विनोद राय यांनी यावेळी दिले.
प्रशिक्षक निवडणे अभिमानास्पद – कपिलदेव
क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य बनलो याचा आनंद आहे. तसेच हिंदुस्थानी संघाचा कोच निवडण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती हीदेखील अभिमानास्पद बाब आहे, असे कपिलदेव यावेळी म्हणाले.





























































