IND Vs PAK – पाकिस्तानची पुढची पिढी बरबाद होईल… कपिल देव यांनी मोहसीन नक्वींना फटकारलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. 15 फेब्रुवारीला सामना होणार होता. मात्र, पाकिस्तान सरकारने हिंदुस्थानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने क्रिकेट जगतातलं वातावरण तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. हिंदुस्थानचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही पाकिस्तान सरकारल खडे बोल सुनावत सावधगिरीचा इशारा दिला आहे.

माध्यम प्रतिनीधींशी बोलताना कपिल देव यांनी पाकिस्तान सरकारच्या भुमिकेवर सडेतोड भाष्य केलं आहे. युवा खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. जर हा निर्णय खेळाडूंनी घेतला असेल तर ते पुढे येऊन तस सांगू शकतात. पण जर बोर्ड तुम्हाला खेळू नका असे म्हणत असेल तर हा प्रकार देशाच्या प्रतिष्ठेला हानी पाोहोचवणार असल्याचं कपिल देव यांनी म्हटलं आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेटच्या भविष्यासंदर्भातही त्यांनी गंभीर इशारा दिला आहे. वारंवार माघार घेतल्यामुळे आणि बहिष्कारामुळे पाकिस्तान क्रिकेट एकटं पडेल. पाकिस्तानची परिस्थिती चांगली दिसत नाही. तुम्ही संपूर्ण पिढी नष्ट करत आहात, अशा शब्दांत कपिल देव यांनी पाकिस्तान सरकारला फटकारलं आहे.

बांगलादेशच्या बहिष्कारवृत्तीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानने हिंदुस्थानविरुद्ध खेळण्यास नकार दिला. पाकिस्तान सराकारने संघाला स्पर्धेत सहभागी होण्यास मान्यता दिली आहे. मात्र, हिंदुस्थानविरुद्ध खेळण्यास नकार दिला. यामुळे वातावरण चांगलच तापलं आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा निर्णय त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. याचे दीर्घकालीन आणि गंभीर परिणाम पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) भोगावे लागतील, असा इशारा आयसीसीने पीसीबीला दिला आहे.