मतदानाची आकडेवारी वेबसाइटवर का नाही? सिब्बल यांचा सवाल

लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे झाले; परंतु निवडणूक आयोगाने झालेल्या मतदानाची पेंद्रनिहाय आकडेवारी अद्याप वेबसाइटवर का प्रसिद्ध केलेली नाही, असा सवाल काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. मतदान झाल्यानंतरची आकडेवारी आणि नंतर प्रसिद्ध केलेली आकडेवारी यात तफावत आहे. तसेच वेबसाइटवर याबाबतची माहितीही नाही, त्यामुळे काही तरी गडबड असल्याचेच दिसत असून राजकीय पक्षांमध्ये संशयाचे वातावरण आहे. निवडणूक आयोगाला आकडेवारी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात काय प्रॉब्लेम आहे, असा सवाल करतानाच याबाबत सिब्बल यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

मतदान झाल्यानंतर पोलिंग एजंटला दिलेल्या 17 सी क्रमांकाच्या फॉर्ममध्ये मतदानाच्या आकडेवारीबाबत सर्व डेटा उपलब्ध असतो. मग मतदानाची आकडेवारी अद्याप निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर का प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, असा सवाल सिब्बल यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडल्यानंतर आज दुसऱया दिवशी सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाकडून मतदानाची अंतिम टक्केवारी उशिराने प्रसिद्ध करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाने सांगितले की, आकडेवारी प्रसिद्ध करण्याबद्दल अशी कुठलीही तरतूद नाही. याबद्दल सिब्बल यांनी प्रचंड आश्चर्य व्यक्त केले. तसेच निवडणूक आयोगाच्या या उत्तरामुळे काहीतरी गडबड असल्याचा संशय विरोधी पक्षांना असल्याकडे सिब्बल यांनी प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले.

काय म्हणाले सिब्बल?

– मतदानाची अंतिम टक्केवारी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यास निवडणूक आयोग का कचरतेय?
– निवडणूक आयोग आकडेवारी वेबसाईटवर प्रसिद्ध करत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये निवडणूक आयोगाने राबवलेल्या मतदान प्रक्रियेबद्दलच संशय आहे.

निवडणूक आयोगाला याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश

निवडणूक आयोगाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान बुधवारी निवडणूक आयोगाला याचिकेप्रकरणी आठवडाभरात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

आता आपल्याला मोदी भगवान यांच्याकडेच जावे लागेल

जर मोजलेल्या मतांची आकडेवारी वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते तर मग मतदान झाल्यानंतरची आकडेवारी वेबसाईटवर का प्रसिद्ध केली जात नाही, असा सवाल सिब्बल यांनी केला. अशा वेळी निवडणूक आयोगावर विश्वास कसा ठेवायचा. आता आपल्याला देवाकडेच जावे लागेल. मोदीच भगवान आहेत, हजारो वर्षांनंतर भगवान आलेत. सर्व पक्षांनी भगवान मोदी यांच्याकडे जाऊन सांगायला हवे की, देशात 80 कोटी गरीब जनता आहे, त्यांचा उद्धार करा. त्यांच्या खात्यात 15 लाख रुपये टाका. भगवान मोदी यांनी सर्वाचा त्याग केला आहे, अशा शब्दांत सिब्बल यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला.

पाचव्या टप्प्यानंतरही मतदानाच्या आकडेवारीत तफावत

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यानंतर निवडणूक आयोगाने 61.48 टक्के मतदान झाल्याचे म्हटले होते, मात्र निवडणूक आयोगाने आता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 62.2 टक्के मतदान झाले. यात महिलांची संख्या पुरुषांहून अधिक असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. पाचव्या टप्प्यात सहा राज्ये आणि दोन पेंद्रशासित प्रदेशातील 49 जागांसाठी मतदान झाले. यात 4.69 कोटी पुरुष, 4.26 कोटी महिला आणि 5409 तृतीयपंथी होते. त्यानुसार एकूण 8.95 कोटी लोकांनी मतदान केले. बिहार, झारखंड, लडाख, ओडिशा आणि उत्तर प्रदेशात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक होती, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.